1,002 दहशतवाद्यांचा खात्मा : 174 नागरिकांनाही गमवावा लागला जीव, गृह राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू काश्मीरमध्ये 2018 ते 2022 दरम्यान या पाच वर्षांच्या कालावधीत 761 दहशतवादी घटनांमध्ये 174 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच यादरम्यान सुरक्षा दलांनी 1,002 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली. 2018 ते 31 जुलै 2023 दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या 319 जवानांनी आपला जीव गमावला. यादरम्यान 791 दहशतवादी घटना घडल्या. चकमक आणि काउंटर ऑपरेशन दरम्यान 35 नागरिकांनाही प्राण गमवावे लागल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दहशतवादी घटनांबाबत महत्त्वाची माहिती दिली. 2018 ते 2022 या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये 761 दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकूण 174 नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच या काळात केंद्रशासित प्रदेशात 626 चकमकींमध्ये 35 नागरिक मारले गेले. याच कालावधीत हुतात्मा झालेल्या सुरक्षा जवानांची संख्या 308 होती.
एनडीआरएफच्या तुकड्यांमध्ये वाढ
देशात आपत्ती निवारण यंत्रणा मजबूत करण्यासाठी भारत सरकारने चार अतिरिक्त एनडीआरएफ बटालियन वाढवण्यास मान्यता दिली होती, ज्यामुळे एनडीआरएफ बटालियनची संख्या 12 वरून 16 पर्यंत वाढल्याचेही राय यांनी स्पष्ट पेले. नुकत्याच आलेल्या पुराच्या काळात पंजाबमध्ये एकूण 103 मदत शिबिरे उभारण्यात आली होती. राज्याच्या प्रयत्नांना पूरक म्हणून, पंजाब सरकारच्या विनंतीनुसार, राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण दलाच्या 11 पथकांना राज्यातील पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफने आतापर्यंत 308 लोकांना वाचवले असून 4,335 लोकांना आणि 202 जनावरांना जीवदान दिल्याचेही स्पष्ट केले.









