संग्राम काटकर, कोल्हापूर
Kolhapur News : बिंदू चौक, बागवान गल्लीतील श्रद्धास्थान म्हणून असलेला हा हजरत मलिक रेहान मिरासाहेब पंजा.76 वर्षांपूर्वी (कै.)आनंद दत्तू पंडत यांनी विशाळगडावरील हजरत मलिक रेहान मिरासाहेब बाबा दर्ग्यातील मिरासाहेब बाबांच्या नावाने नाल बनवून आपल्या छोट्याशा कौलाऊ घरात पंजाची प्रतिष्ठापना केली.सुऊवातीची तीन-चार दशके पंजाची साडे चार फुटउंची होती. कालांतराने सहा फुटी झाली.आणि आता वाढता वाढता वाढे याप्रमाणे गेल्या 23 वर्षात पंजा दहा फुट झाला आहे.रेखीव पद्धतीने बांधला जाणारा हा पंजा 10 वर्षांनी येत्या 27 जुलै रोजी भेटीसाठी बाहेर पडणार आहे. या सोहळ्याचा वाद्यांसह बागवान गल्लीतील तडाखा तालीमचे कार्यकर्ते अग्रभागी असणार आहेत.
आनंद पंडत यांनी मोहरममध्ये पंजाची केलेली प्रतिष्ठापना व त्याच्या भेटीचा सोहळा आनंद देणारा आहे. पंडत यांची विशाळगडावरील मिरासाहेब बाबा या देवस्थानावर श्रद्धा होती. या श्रद्धेपोटीच त्यांनी मिरासाहेब बाबांच्या नावाने घरात पंजाची प्रतिष्ठापना केली.आपले लहान भाऊ मुराद पंडत यांच्या मदतीने पंजाची सेवा सुऊ केली.ठिकठिकाणचे भाविक मोहरम काळात काही तरी मागणे आणि जरी पटका घेऊन पंजाकडे येऊ लागले होते.याचवेळी सेवेकरी झाड म्हणून प्रभाकर पंडत,अब्दुलमजिद शेख यांनी पंजाची सेवा स्वीकारली होती. दरम्यानच्या काळात पंजाला विशाळगडावरील मिरासाहेब दर्ग्याच्या भेटीला नेण्याची इच्छा आनंद व मुराद या दोघा भावांनी झाली.पण काही कारणास्तव ते शक्य होत नव्हते. 1975 ला दर्ग्याच्या भेटीला पंजा नेण्याचा संकल्प सोडला. मोहरमच्या पाचवीला पंजाला ब्रह्मपुरीपर्यंत नाचवंत नेऊन वाहनाने दर्ग्याकडे नेले जाऊ लागले.
पंजा भेटीसाठी येत असल्याचे दखल घेऊन दर्गा व्यवस्थापनाने मोहरमच्या सातवी पंजासोबत असलेल्या सेवेकरी झाडांना खाई फोडण्याचा मान दिला.पंजाला मानाचा जरी पटका, गलेफ व प्रसाद अर्पण करण्यास सुऊवातही केली.दर्ग्याकडून झाडांना मिळत राहिलेला खाई फोडण्याच्या मान आणि जरी पटका हा पंडत कुटुंबाला परमोच्च आनंद देऊ लागला. या आनंदात समाधान मानून जीवन जगत असतानाच पंडत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.पंजाचे सेवेकरी मुराद पंडत यांचे निधन होऊन काही वर्षे होतात तोवर 1998 साली सेवेकरी आनंद पंडत यांचेही निधन झाले.मात्र हतबल न होता मुराद यांची मुल दिनेश,सचिन व विशाल यांनी पंजांच्या सेवेचे व्रत स्वीकारले.चुलते आनंद व वडील मुराद यांच्याप्रमाणेच पंजाचे मोहरममधील धार्मिक विधीसह पंजाभेटी व विशाळगडावरील मिरासाहेब दर्ग्याच्या भेटीचा सोहळा सुऊच ठेवला आहे.हा सोहळा न चुकता साजरा केला जातो.
काही वर्षांपूर्वी पंजाचे सेवेकरी झाड प्रभाकर पंडत,अब्दुलमजिद शेख याचे निधन झाले आहे.त्यामुळे प्रभाकर यांच्या जागी त्यांचा मुलगा रोहित व अब्दुलमजिद यांच्या जागी त्यांचा मुलगा ताहिरने व एक अन्य तऊण नितीन शिंदे या तिघांनी झाड होऊन पंजाची सेवा स्वीकारली.त्यांनीच दिलेल्या शब्दानुसारच पंजाला 10 वर्षांच्या खंडानंतर भेटीसाठी बाहेर काढले जाणार आहे.तसेच पंजाऐवजी त्याच्याशेजारी प्रतिष्ठापना केलेली निशानी विशाळगडावरील दर्ग्याच्या भेटीला रवाना केली जाणार आहे.कोल्हापुरातील पंजाभेटीच्या सोहळात बाबुजमाल दर्गा,वाळव्याची स्वारी (जुना राजवाडा),बाराईमाम तालीम,घुडणपीर दर्गा येथील पंजांसह लक्ष्मीपुरीतील पंजांना भेटी दिल्या जाणार आहेत.भेटीच्या सोहळ्यात पारपंरिक वाद्यांचा गजर तर असेलच, शिवाय तडाखा तालीमचे कार्यकर्ते पंजाभेटी नियोजन करणार आहेत.
1998 पासून पंजाला पहिले पाच दिवस घरात तर मोहरमच्या सातव्या दिवसापासून विसर्जनापर्यंत घराच्या दर्शनीला बसवले जात आहे.त्यामुळे भाविकांना पंजाची सेवा करण्यात,जरी पटके अर्पण करणे सोपे जात आहे.यंदाच्या वर्षी बांधलेल्या नव्या घरात पंजाची प्रतिष्ठापना केली आहे.केवळ पंजासाठी मोठा हॉलही बांधला आहे. त्याच्या शेजारी पंजाचे पटके व साहित्य ठेवण्याची व्यवस्था केली आहे.त्यामुळे आता पंजाच्या प्रतिष्ठापनेतील सर्व अडचणी दुर झाल्या आहेत.
दिनेश पंडत (पंजा सेवेकरी)









