सुधाकर काशीद,कोल्हापूर
Kolhapur News : कोठेही डिजिटल फलक नाही .फटाक्याचा दणदणाट नाही.तोंडाला फासायला एक आणि कापायला एक असे दोन केक नाहीत.शुभेच्छा द्यायला लोकांनी गर्दी करावी म्हणून खाण्यापिण्याची आणि तात्पुरता गुच्छ देण्याची ही खास सोय नाही ,पण तरीही बाळूचा 75 वा वाढदिवस आज अंबाबाईच्या चरणावर डोके ठेवून साजरा झाला.फक्त स्वयंघोषित पुढाऱ्यांचेच वाढदिवस थाटामाटात साजरे होतात असे नव्हे तर , मंदिरात 44 वर्ष घंटा वाजवण्याची सेवा देणाऱ्या बाळू नाडगोंडा या साध्या माणसाचाही वाढदिवस आज साजरा झाला.ठबाळू शतक मारायचं ठ अशा शुभेच्छाचा अक्षरश? वर्षाव त्याच्यावर झाला.
बाळूचा वाढदिवस ,त्यानिमित्ताने मंदिर परिसरातले वातावरण आणि फुलांच्या पाकळ्यात न्हाऊन निघालेला बाळू हे चित्र पाहून समाजात सगळंच काही वाईट चाललेलं नाही.साध्या माणसाची ही आपुलकीने कोणीतरी दखल घेते याचा प्रत्यय सर्वांना येऊन गेला.कदाचित बाळूचा वाढदिवस अशा चांगल्या क्षणाचा एक प्रतीक ठरला.बाळू म्हणजे चंद्रकांत कृष्णाजी नाडगोंडा.आज त्याचं वय 75.वयाने खूप ज्येष्ठ असला तरीही अहो जाओची विशेषणे बाळूला आज पर्यंत कधीच लागली नाहीत.तो बाळू म्हणूनच वावरत राहिला. बाळू अंबाबाई मंदिरातील चोपदार व घंटा वाजवण्याची सेवा देणारा. चोपदार म्हणजे काय ? तर, बाळूच्या हातात देवीचा अस्सल सोन्याचा सव्वाशे वर्षांपूर्वीचा मानदंड .देवीची उत्सव मूर्ती ज्यावेळी गाभ्रायातून बाहेर काढली जाते त्यावेळी बाळूची ललकारी गाभ्रायात घुमते . बाळू सोन्याचा मानदंड उंचावतो व त्यानंतरच ही उत्सव मूर्ती जाग्यावरून हलवली जाते.
याशिवाय बाळूचे रोजचे काम म्हणजे अंबाबाईच्या देवळातील घाटी दरवाजावरील भली मोठी घंटा दिवसातून पाच वेळा वाजवणे.एक मिनिट पुढे नाही एक मिनिट मागे नाही पहाटे साडेचार वाजता पहिल्यांदा घंटा वाजवली जाते .या घंटेचे तरंग शहरात दूरवर पसरतात.झोपेत असले तरीही त्यांचे हात आपोआप जोडले जातात .पहाटे साडेचार सकाळी साडेआठ सकाळी साडेअकरा रात्री आठ व रात्री दहा असे पाच वेळा ही घंटा वाजवण्याचे काम बाळूने न चुकता सलग 44 वर्षे केले. चोपदार म्हणून देवीच्या पालखी जवळ हातात सोन्याचा मानदंड धरलेल्या बाळूचे स्थान तर ठरूनच गेले.पहाटे साडेचारला घंटा वाजवण्यासाठी आंघोळ करून पहाटे चार वाजता बाळू मंदिरात हजर.व रात्री मंदिर बंद होताना घंटेचे शेवटचे टोल देऊनच त्याची सेवा संपायची. मोठ्या घंटेचे टोल कानावर पडून त्याच्या कानाला ऐकायला कमी येऊ लागले.बाळूची सेवा पाहून कानावर उपचार करण्राया डॉक्टरांनी त्याच्यावर दीर्घ काळ मोफत उपचार केले.आज बाळू 75 वर्षाचा झाला. त्याने देवीच्या चरणावर डोके ठेवून जणू काही 44 वर्षे देवीने सेवेची संधी दिल्याबद्दल देवीला कृतज्ञतेचेचा नमस्कारच केला. वयोमानानुसार बाळू घाटी दरवाजावर दगडी पाय्रया चढून जाऊ शकत नाही.भल्या म्हणून त्या घंटेचा टोल दोरीने त्याला ओढता येत नाही .त्यामुळे त्याचा जागी मुलगा प्रसाद यांनीही सेवा पुढे सुरू ठेवली आहे.
रोज मंदिरात घंटा वाजवायची सेवा हे तसे खूप वेगळे काम. मी पहाटे साडेचारच्या ठोक्याला घंटेचा पहिला टोल देत होते. 44 वर्षात त्यात कधी खंड पडला नाही. घंटेच्या सानिध्यात राहुन ऐकायला कमी येऊ लागले. पण त्यामुळे फारसे काही अडत नाही.
बाळू नाडगोंडा









