वर्ल्ड गोल्ड कौन्सीलची माहिती : 56 टक्के परतावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गोल्ड ईटीएफमध्ये 7500 कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. सोन्याच्या वाढत्या किमती सोबतच यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाणपण वाढलेले दिसून आले आहे.
सलग 5 महिन्यात सकारात्मक गुंतवणूक
ऑक्टोबरमध्ये पाहता देशातील लोकांनी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे ईटीएफमध्ये जवळपास 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल यांच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सलग पाचव्या महिन्यामध्ये गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक सकारात्मक राहिली आहे. याआधी पाहता मे महिन्यात ईटीएफमधून 602 कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. त्यानंतर जून ते ऑक्टोबर या कालावधीत सलग महिन्यांमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये पाहता 8075 कोटी रुपयांची गुंतवणूक गोल्ड ईटीएफमध्ये केली गेली होती. परताव्याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा गोल्ड ईटीएफने गेल्या वर्षभरामध्ये पाहता 56 टक्के परतावा दिला आहे.
एकंदर 25 हजार कोटीची गुंतवणूक
ऑक्टोबर महिन्यामध्ये 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली असून यावर्षीची ही विक्रमी गुंतवणूक मानली जात आहे. आत्तापर्यंत पाहता जवळपास 25 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक यामध्ये करण्यात आली आहे. एकूण अॅसेट अंडर मॅनेजमेंट ईटीएफचे मूल्य हे आता जवळपास 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागच्या वर्षांचा विचार करता 2024 मध्ये 1.29 अब्ज, 2023 मध्ये 310 दशलक्ष आणि 2022 मध्ये फक्त 33 दशलक्ष रुपये इतके मूल्य होते.
जागतिक स्तरावर भारत तिसरा
जागतिक स्तरावर पाहता ऑक्टोबर महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये जी गुंतवणूक झाली आहे ती पाहता भारत हा सध्याला तिसऱ्या नंबरवर आहे. पहिल्या नंबरवर अमेरिका हा देश असून 56 हजार कोटी रुपयांची गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक झाली असून दुसऱ्या नंबरवर चीन हा देश असून 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येथे झाली आहे.
यावर्षी 58 टक्के परतावा
2025 या वर्षामध्ये पाहता गोल्ड ईटीएफने आत्तापर्यंत 58 टक्के इतका परतावा दिला आहे. यावर्षी आत्तापर्यंत सोन्याच्या किमतीत 43 हजार 938 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 204 ला पाहता दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,162 रुपये होती जी अलीकडच्या दिवसांमध्ये 1 लाख 20 हजारवर पोहोचली आहे.









