इचलकरंजी :
शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील ग्रामदैवत श्री कल्याणताई माता देवीच्या यात्रेनिमित्त मंगळवारी आयोजित महाप्रसादामुळे गावातील सुमारे 750 नागरिकांना अन्न विषबाधा झाल्याची घटना घडली. गावातील अनेकांना मध्यरात्रीनंतर उलट्या व जुलाब होऊ लागल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
शिवनाकवाडी सुमारे चार हजार लोकवस्तीचे गाव असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंगळवारी येथील ग्रामदैवत श्री कल्याणताई माता देवीचे यात्रा भरवली होती. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. रात्रीच्या सुमारास गावक्रयांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यानंतर रात्री दोन ते अडीचच्या सुमारास काही जणांना प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. त्यानंतर पहाटेपर्यंत संपूर्ण गावात अनेकांना उलट्या, जुलाब सुरू झाले. नागरिकांनी तत्काळ शिरोळ, कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली व इचलकरंजीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये धाव घेतली.
वाढती रुग्णसंख्या पाहता इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात तातडीने दोन स्वतंत्र कक्ष तयार करून उपचार सुरू करण्यात आले. इचलकरंजीसह विविध रुग्णालयांत 200 ते 225 रुग्णांवर उपचार सुरू असून अनेकांना प्रथमोपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील व त्यांच्या चमूने तातडीने उपचार सुरू केले. तसेच, औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, माजी आमदार उल्हास पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी शिवनाकवाडी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तर आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क साधून अधिकाधिक वैद्यकीय मदत मिळविण्याची मागणी केली. यावेळी पोलीस उपाधीक्षक समीर साळवे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनीही रुग्णालयात भेट दिली.
आरोग्य विभागाने महाप्रसादाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून लवकरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होईल. तसेच गावात आशा सेविकांना घरोघरी पाठवून संशयित रुग्णांची माहिती घेतली जात असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाने सांगितले.
सध्या बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरू नका, योग्य उपचार दिले जात आहेत, असे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर संकट ओढवले असले तरी आरोग्य यंत्रणेच्या वेगवान हालचालींमुळे अनेकांना तातडीचा दिलासा मिळाला आहे.
- परिस्थिती नियंत्रणात
एकूण 200 हून अधिक जणांवर ठिकठिकाणी उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णावर उपचार करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. हातकणंगले, शिरोळ तालुका वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकाने वेळीच औषधोपचार केले आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असून यात एकही गंभीर नाही. आशा सेविकांनी मदत घेतली जात असून त्यांना घरोघरी पाठवून रुग्णांची संख्या घेतली जात आहे. संध्याकाळपर्यंत डेटा तयार होण्याची शक्यता आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे
- आयजीएम रुग्णालय प्रशासनाची तत्परता
इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात 55 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने तातडीने दोन स्वतंत्र कक्ष सुरू केले. रुग्णालय प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना हाती घेतल्या असून, डॉक्टर, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मच्रायांना तातडीने बोलावण्यात आले. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अतिरिक्त 100 खाटांची सोय करण्यात आली. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील आणि त्यांच्या पथकाने उपचारांची तत्काळ व्यवस्था केली. औषधांचा पुरवठाही सुरळीत करण्यात आला आहे.
- गावाला छावणीचे स्वरूप
शिवनाकवाडी गावातही प्राथमिक शाळा, बाळूमामा मंदिर, प्रजापिता ब्रह्मकुमारी मंदिर अशा अनेक ठिकाणी तात्पुरत्या आरोग्य छावण्या उभारण्यात आल्या असून येथे प्राथमिक उपचार दिले जात आहेत. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.








