उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून 26 जुलैपासून राज्यातील पदवी महाविद्यालये सुरू होत आहेत. आतापर्यंत ७५ टक्के विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
बेंगळूरमध्ये बुधवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लस देण्याची मोहिम गतीमान करण्यात आली आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापक, महाविद्यालयांमधील इतर कर्मचाऱ्यांनाही लस दिली जात आहे. उपलब्ध असलेल्या आणि उपलब्ध होणाऱ्या लसीचा सुरळीतपणे पुरवठा केला जात आहे. कॉलेजमधील वर्गांसाठी हजर होण्याऱ्या विद्यार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतलाच पाहिजे, असे ते म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण खात्यामध्ये अनेक सुधारणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील डिजिटल शिक्षणामध्ये असणारे अंतर कमी करण्यासाठी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (एलएमएस) जारी करण्यात आले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅब्लेट पीसी वितरित करण्यात आले आहेत, असेही डॉ. अश्वथ नारायण म्हणाले.









