30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी करावी, अन्यथा कारवाई
बेळगाव : गॅस वितरणात सुरळीतपणा आणण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे. आतापर्यंत 75 टक्के ई-केवायसीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ग्राहकांच्या गॅस ई-केवायसीचे काम सुरू आहे. मात्र, एप्रिलनंतर गॅस ई-केवायसी नसलेल्या ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणार नाही, असा इशारा गॅस एजन्सींनी दिला आहे. गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी गॅस ई-केवायसीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मात्र, काही ग्राहकांच्या निरुत्साहीपणामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. घरोघरी जाऊन वितरकांकडून ई-केवायसीचे काम केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी ग्राहक वेळेत उपलब्ध नसल्याने कामात अडथळा निर्माण होऊ लागला आहे. काही ग्राहकांचा मृत्यू झाल्याने ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कार्डधारकांना 300 रुपये सबसिडी दिली जाते. मात्र, या ग्राहकांनाही ई-केवायसी बंधनकारक आहे. शहर-ग्रामीण भागात घरगुती गॅस ग्राहकांची संख्या मोठी आहे. या सर्व ग्राहकांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी स्वत:च्या मोबाईलवरूनही करणे शक्य आहे. प्रारंभी गॅस एजन्सींनी स्वत:च्या कार्यालयात ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, ग्राहकांच्या गर्दीमुळे हे काम वितरकांवर सोपविण्यात आले आहे. मात्र अद्यापही 30 टक्क्यांहून अधिक ग्राहकांची ई-केवायसी शिल्लक आहे. अशांनी 30 एप्रिलपर्यंत गॅस ई-केवायसी करावी. अन्यथा कारवाईचा इशारा गॅस एजन्सींनी दिला आहे.









