पणजी / विशेष प्रतिनिधी
‘माझी बस’ या गोवा सरकारच्या नव्या योजनेंतर्गत कदंब परिवहन महामंडळाकडे नावनोंदणी करण्यासाठी खाजगी बसचालकांना दिलेली मुदत काल गुरुवारी संपुष्टात आली. 75 बसचालकांनी नोंदणी केली आहे. त्यांनी आपली बस चालवायला कदंबकडे देण्यास संमती दर्शविली आहे. तथापि कदंबने 30 जूनपर्यंत उर्वरित बसचालकांना नावनोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘माझी बस’ योजनेंतर्गत दक्षिण गोव्यातील काणकोण, सांगे, केपे, फोंडा, सासष्टी या तालुक्यांतील बसचालकांना कदंबकडे बस चालू करण्याच्या प्रस्तावासाठी अर्ज सादर करण्यास एक जूनपासून 21 जूनपर्यंत मुदत दिली होती. या मुदती अंतर्गत 75 बसचालकांनी आपली बस कदंबकडे देण्यास तयारी दर्शवली आहे. यामध्ये काणकोणमधील 38, फोंडा परिसरातील 2, तर केपेमधील 35 बसगाड्यांचा समावेश आहे.
कदंबचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार फोंडा तालुक्यातील बसचालकांनी काही कागदपत्रे पूर्ण करण्यास आणखी काही दिवस लागतील, त्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती. केपे तालुक्यातील बसचालकांनी देखील अशीच मागणी केली होती. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री आणि वाहतूकमंत्र्यांकडे हा प्रश्न मांडलेला आहे. 40 टक्के बसचालकांनी आपल्या बसेस कदंबकडे चालविण्यास देण्याचे ठरवले आहे. एकूण 185 बसेसपैकी 75 बसचालकांनी मान्यता दिलेली आहे. इतर बसचालकांनी देखील कदंबकडे नावनोंदणी करावी. ज्यांनी नोंदणी केलेली आहे, त्यांनी लवकरच कदंबबरोबर करार केल्यानंतर या बसेस मार्गस्थ करण्यात येतील, असे संजय घाटे म्हणाले.









