उज्ज्वला योजनेला 2025-26 पर्यंत मुदतवाढ : गरिबांसाठीच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची चालना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दारिद्र्या रेषेखाली असणाऱ्या गरिबांसाठीच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत आणखी 75 लाख विनामूल्य गॅस कनेक्शन्सना केंद्र सरकारने संमती दिली आहे. नव्या गॅस कनेक्शन्ससाठी 1,650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आगामी 1 वर्षात ही कनेक्शन्स पुरविली जाणार आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरची किंमत आता 700 रुपयांच्या आसपास आहे.
या 75 लाख विनामूल्य गॅस कनेक्शन्ससह आता या योजनेच्या अंतर्गत दिल्या गेलेल्या कनेक्शन्सची संख्या 10.35 कोटी होणार आहे. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये केला होता. या योजनेमुळे गरीब महिलांचा मोठा लाभ झालेला असून त्यांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करण्याची सोय मिळाली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा दर 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी घोषित केला होता. त्याचवेळी या गॅस कनेक्शन्सची घोषणा झाली होती.
सुवेन कंपनीत गुंतवणुकीला मान्यता
सुवेन फार्मास्युटिकल्स या औषध निर्मिती कंपनीत सायप्रस या देशातील बेरहिंडा ही कंपनी 9,589 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीलाही केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिली. या गुंतवणुकीनंतर सुवेन कंपनीतील विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 90.1 टक्के इतके होणार आहे. बेरहिंडा कंपनी सुवेनचे 75 टक्क्यांहून अधिक समभाग या गुंतवणुकीतून विकत घेणार आहे. या गुंतवणुकीच्या प्रस्तावाची कायदेशीर पडताळणी सेबी, रिझर्व्ह बँक, सीसीआय आणि इतर संबंधित प्राधिकरणांनी केली असून प्रमाणपत्रही सरकारला दिले आहे.
विदेशी गुंतवणुकीत वाढ
औषधनिर्मिती क्षेत्रात गेल्या पाच वर्षांमध्ये 43,713 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे. यांपैकी 58 टक्के गुंतवणूक गेल्या एकाच वर्षात झाली आहे. कोणत्याही पाच वर्षांमध्ये झालेली ही भारतातील आतापर्यंतची सर्वात जास्त औषधनिर्मिती गुंतवणूक आहे, अशीही माहिती देण्यात आली.
ई-कोर्ट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला संमती
न्यायव्यवस्था अत्याधुनिक आणि गतीमान करण्यासाठीच्या ई-कोर्ट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत संमती देण्यात आली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या प्रकल्पाची प्रशंसा केली आहे. या तिसऱ्या टप्प्याचा खर्च 7,210 कोटी रुपये असून तो आगामी चार वर्षांमध्ये साकारणार आहे.
नव्या संसदेत पंतप्रधान मोदींकडून ध्वजारोहण
नूतन संसद भवनात 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण होणार आहे. याच दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. या संसद भवनात 19 सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्याआधी 18 सप्टेंबरला जुन्या संसद भवनाला निरोप देण्यात येणार आहे.
जी-20 संबंधी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 संघटनेचे नेतृत्व यशस्वीरित्या केले आहे. साऱ्या जगाने त्यांच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक केले आहे. त्यांच्या नेतृत्वात जगात भारताचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले असून भारतासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे.
महत्वाच्या निर्णयांना संमती
ड 75 लाख विनामूल्य गॅस कनेक्शन्ससाठी 1,650 कोटी रुपये लागणार
ड सुवेन फार्मास्युटीकल्स मधील वाढीव विदेशी गुंतवणुकीला दिली मान्यता
ड जी-20 चे यशस्वी नेतृत्व करण्याकरीता पंतप्रधान मोदी यांचे अमिनंदन









