वर्क फ्रॉम होमचा प्रभाव : दर 40 मिनिटांनी कामादरम्यान ब्रेक घेण्याची सूचना
कोविड-19 संक्रमणाच्या या काळात कार्यालयांमध्ये काम करणारे बहुतांश जण सध्या घरातून काम करत आहेत. एका अध्ययनानुसार 75 टक्के भारतीय कार्यालयीन कर्मचाऱयांना घरातून संगणकावर काम केल्याने मांसपेशी आणि हाडांमधील वेदनांना सामोरे जावे लागत आहे. दिवसात 3 वेळा स्ट्रेचिंग केल्यास संगणकीय कामकाज करणाऱया लोकांमध्ये होणाऱया मनगट, पीठ, मान आणि खांदेदुखीपासून वाचविले जाऊ शकते असे उद्गार नॉर्थ वेस्टर्न मेडिसीन सेंट्रल डुपेज हॉस्पिटलच्या प्रमुख ऑक्युपेशनल थेरपिस्ट जॉय बंगान्ज यांनी काढले आहेत.
वेदना का होतात?
कॅनडाच्या मॉन्कटन विद्यापीठाच्या मॅकेनिकल इंजिनियरिंग विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. नॅन्सी ब्लॅक यांच्युसार जेव्हा दीर्घकाळापर्यंत एकाच स्थितीत उभे किंवा बसून राहिल्यास गुरुत्वाकर्षणाचे बळ संबंधिताच्या पाठीच्या कण्यावर दबाव टाकते. डिस्कवर पडणारा हाच दबाव कंबरदुखी आणि नर्वशी संबंधित समस्यांच्या स्वरुपात समोर येतो. गुरुत्वाकर्षण पाठीच्या हाडावरही दबाव टाकते. हा दबाव डिस्कदरम्यान आढळून येणाऱया फ्लूइडला बाहेरच्या दिशेने खेचतो. दर 40 मिनिटांमध्ये 20 ते 30 सेकंदांचा बेक घेतला तरीही फ्लूइड स्वतःच्या प्रत्यक्षस्थितीत पोहोचतो. खूचीतून उभे राहून हलके स्ट्रेचिंग करणे किंवा पुन्हा किचनपर्यंत एक ग्लास पाणी घेण्यासाठी जाणे देखील या हालचालीत सामील असल्याचे ब्लॅक यांनी म्हटले आहे.
दिवसातून स्टेचिंगचे 3 प्रकार केले जावेत
मनगटाची हालचाल

उभे राहून एक हात समोर आणावा. तळहात खालच्या दिशेने ठेवावा. आता दुसऱया हाताद्वारे पहिल्या हाताची बोटं पकडून मागील दिशेने नेण्याचा प्रयत्न करावा. ताण जाणेपर्यंत ही हालचाल करत रहावी. थोडा वेळ याच स्थितीत थांबावे. हात परत जुन्या स्थितीत आणून सरळ सोडावा. आता पहिला हात सरळ ठेवत दुसऱया हाताची बोटं आणि पंजा खालच्या दिशेने न्यावा. असाच प्रकार दुसऱया हातासोबत करावा.
पाठ आणि छातीचे स्ट्रेचिंग

दोन्ही हातांची बोट परस्परांमध्ये अडकवून हात डोक्याच्या मागे न्यावेत. आता हातांना अशाप्रकारे मागील दिशेने वळवावेत जेणेकरून दोन्ही खांद्यांचा परस्परांना स्पर्श व्हावा. खांद्यांवर दबाव टाकत 5 ते 6 सेकंदांपर्यंत थांबावे. दीर्घ श्वास घेऊ खांदे सैल सोडावेत. हा प्रकार पुन्हा एकदा केला जावा. कामाशी संबंधित इजा तत्काळ प्रभाव दाखवत नाहीत. परंतु दीर्घकाळापर्यंत अशाच स्थितीत राहिल्यास समस्या तीव्र होऊ शकते असे डॉ. नॅन्सी ब्लॅक यांनी सांगितले आहे.
खांद्यांचा व्यायाम

सरळ उभे राहून हळूहळू स्वतःच्या खांद्यांना कानाच्या दिशेने न्यावे. 3 ते 5 सेकंदांपर्यंत याच स्थितीत थांबावे. नंतर त्यांना हळूहळू पुन्हा खाली आणावे. या प्रक्रियेला 3 ते 4 वेळा करत रहावे.
इराण : मानवी चाचणी सुरू

इराण कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू करणार आहे. देशात प्राण्यांवर या लसीची चाचणी पूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे. इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सचे डीन जलील यांनी याची माहिती दिली आहे. मानवी चाचणीचे चांगले निष्कर्ष येतील आणि लोकांना महामारीपासून बचावासाठी उत्तम काम केले जाणार असल्याचे जलील म्हणाले.
इस्रायल : पुन्हा टाळेबंदी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी पुन्हा 3 आठवडय़ांसाठी देशभरात टाळेबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. ही टाळेबंदी शुक्रवारपासून लागू होणार आहे. याचबरोबर देशभरात पुन्हा टाळेबंदी लागू करणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे. या टाळेबंदीत लोकांना स्वतःच्या घरापासून 500 मीटरच्या कक्षेतच रहावे लागणार आहे. परंतु ते मर्यादित काळासाठी कामावर जाऊ शकतात. देशातील रुग्ण वाढू लागले आहेत. आतापर्यंत 1 लाख 55 हजार 604 रुग्ण सापडले असून 1,119 जणांना जीव गमवावा लागला आहे.
हॉटस्पॉटमध्ये निदर्शने

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये लोकांनी हॉटस्पॉट असलेल्या भागात सरकारच्या विरोधात निदर्शने केली आहेत. संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या उपाययोजनांवर लोक नाराज आहेत. निदर्शने करणाऱयांनी पोलिसांवर फळे आणि भाज्यांचा मारा केला अहे. पोलिसांनी महामारीशी संबंधित नियमांचा भंग केल्याप्रकरणी 74 जणांना अटक केली आहे. तर 176 जणांवर दंड ठोठावला आहे. निदर्शनांमध्ये सुमारे 250 जणांनी भाग घेतला होता.
तिसऱया टप्प्याची चाचणी सुरू

दोन अमेरिकन कंपन्यांनी कोरोना लसीच्या तिसऱया टप्प्याची चाचणी सुरू करण्याची घोषणा केली आहे. फायजर आणि बायोएनटेक फार्मा कंपनीने चाचणीच्या पुढील टप्प्यासाठी स्वयंसेवक निवडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तिसऱया टप्प्यात 44 हजार लोकांना लस दिली जाणार आहे. कंपनीने यापूर्वी या टप्प्यासाठी 30 हजार लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
दिवसात उच्चांकी रुग्ण

मागील 24 तासांमध्ये जगभरात उच्चांकी 3 लाख 7 हजार 930 रुग्ण सापडले आहेत अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. सर्वाधिक रुग्ण भारतात आढळले आहेत. दिवसातील रुग्णसंख्येप्रकरणी अमेरिका दुसऱया स्थानावर असून ब्राझील तिसऱया क्रमांकावर आहे. मागील वेळी सर्वाधिक रुग्ण 6 सप्टेंबर रोजी आढळून आले होते. त्या दिवशी बाधितांचा आकडा 3 लाख 6 हजार 857 राहिला होता.
ब्रिटन : निर्बंध वाढले

ब्रिटन सरकारने वाढते रुग्ण पाहता काही भागांमध्ये निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 80 लाख लोकांना याचे पालन करावे लागणार आहे. सद्यकाळात कोरोनावरून अत्यंत बिकट स्थिती असल्याने याचमुळे नियमांचे कठोरपणे पालन करावे लागणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. देशात आतापर्यंत 3 लाख 67 हजार 592 रुग्ण समोर आले आहेत. 41 हजार 712 मृत्यू झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मंजुरी

सौदी अरेबियाने मंगळवारपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर लादण्यात आलेले निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. सुमारे 6 महिन्यांनी देशात काही अन्य देशांच्या फ्लाइट्सला येण्याची मंजुरी देण्यात आली होती. 1 जानेवारीनंतर सौदी अरेबिया रस्ते आणि समुद्राच्या मार्गाने स्वतःच्या देशाच्या लोकांच्या वाहतुकीवरही लावण्यात आलेली बंदीही हटविणार आहे. याच्या तारखेची घोषणा डिसेंबरमध्ये करण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. याचबरोबर वैध व्हिसायुक्त अनेक देशांचे लोक देखील सौदीत येऊ शकतात, परंतु यासाठी त्यांना संक्रमण नसल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.









