प्रतिनिधी/ फलटण
नरेंद्र मोदी देशातील सर्वसामान्यांना न्याय देणारे, विकासाची दृष्टी असणारे पंतप्रधान आहेत. देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर द्रोपदी मुर्मू यांना संधी देऊन देशाच्या इतिहासात पाहिल्यांदाच आदिवासी समाजाला न्याय दिला असल्याचे मत केंद्रिय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
फलटण येथील दलित चळवळीतील कार्यकर्ते चंदकांत अहिवळे यांच्या शोकसभे साठी आले होते, शोकसभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी रिपाईचे प. महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, विजय येवले, मधुकर काकडे, मुन्ना शेख, संजय निकाळजे, राजू मारूडा, अभिलाष काकडे, दत्ता अहिवळे उपस्थित होते.
सब का साथ सबका विकास ही भूमिका घेऊन केंद्रातील सरकार काम करीत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या अगोदर दलीत समाजातील रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची संधी दिली. आज द्रोपदी मुर्मू यांना संधी देऊन गेल्या 75 वर्षात आदिवासी समाजाला न्याय दिला. नरेंद्र मोदी विकासाच्या दिशेने काम करीत आहेत. केंद्रातील माझ्या सामाजिक न्याय विभागाचे वार्षिक आर्थिक बजेट 1 लाख 42 हजार 241 कोटी रूपयांचे असून देशातील दलित समाजासाठी या विभागामार्फत विविध योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न आपण करीत आहे.
महाराष्ट्रातील सद्य राजकीय घडामोडीवर भाष्य करताना ना. रामदास आठवले म्हणाले, एकनाथ शिंदे यांचेकडे 40 आमदार 12 खासदार असे दोन तृतीयअंश बहुमत आहे. त्यामुळे त्यांच्या राज्यातील सरकारला कोणताही कायदेशीर धोका नाही, शिंदे सरकारची बाजू खंबीर आहे. भाजपबरोबर जाऊन त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केल आहे ते खरे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे खरे वारसदार एकनाथ शिंदेच आहेत, त्यामुळे शिवसेना त्यांचीच राहिल त्यांना धनुष्यबाण ही पक्षाची निशाणी मिळेल. उध्दव ठाकरे यांना मी फार पूर्वीपासुन सांगत होतो, भाजपबरोबर या म्हणून मात्र ते आले नाहीत.









