सर्वाधिक मतदान प्रभाग 1 मध्ये तर सर्वांत कमी 9 मध्ये : तेरा प्रभागातील 43 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद,भाजपा – मगोमध्ये चुरशीची लढत

फोंडा : फोंडा नगरपालिकेच्या 13 प्रभागांसाठी शुक्रवारी निवडणूक होऊन 74.65 टक्के मतदान झाले. एकूण 14,271 मतदारांपैकी 10,653 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक 81.03 टक्के मतदान शांतीनगर प्रभाग 1 मध्ये तर सर्वांत कमी 68. 72 टक्के मतदान कुरतरकरनगर, सदर, काझीवाडा प्रभाग 9 मध्ये झाले. दोघे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने प्रत्यक्षात 13 प्रभागांमध्ये मतदान घेण्यात आले. एकूण 43 उमेदवार रिंगणात होते. रविवार 7 रोजी मतमोजणी होणार आहे. एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी 8 वा. मतदानाला सुऊवात झाली. बॅलट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी बहुतेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर ही गती मंदावली. दुपारी काही केंद्रांवर वातावरण सामसूम दिसत होते. दुपारी 12 वा. पर्यंत साधारण 40 टक्के मतदान झाले व दुपारनंतर पुन्हा मतदानाचा वेग वाढला व सायं. 5 वा. पर्यंत 74.65 टक्के मतदान झाले. फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, माजी खासदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर यांनी खडपाबांध प्रभाग 5 मधील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. पालिका निवडणूक पक्ष पातळीवर किंवा पक्षाच्या चिन्हांवर झालेली नसली तरी भाजपा व मगो पक्षांनी आपले पॅनल उभे केले होते. भाजपा फोंडा नागरिक समिती पॅनलचे 15 पैकी 2 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरीत सर्व तेराही प्रभागांमध्ये त्यांचे उमेदवार आहेत. मगो रायझिंग फोंडा पॅनलचे 12 प्रभागांमध्ये उमेदवार रिंगणात आहेत. कॉंग्रेस पक्षाने सहा प्रभागांमध्ये उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मात्र खरी चुरस भाजपा व मगो पक्षातच दिसून आली. मतमोजणी रविवार 7 रोजी तिस्क फोंडा येथील सरकारी इमारतीच्या सभागृहात होणार आहे. सकाळी 8 वा. पासून मतमोजणीला प्रारंभ होईल व दुपारपर्यंत सर्व तेराही प्रभागांचे निकाल जाहीर होणार आहेत.
प्रभागवार मतदान टक्केवारी
शांतीनगर प्रभाग 1 मध्ये 81.03 टक्के, कुरतरकरनगरी प्रभाग 2 मध्ये 71.62 टक्के, सांताक्रूझ प्रभाग 3 मध्ये 72.83 टक्के, यशवंतनगर प्रभाग 4 मध्ये 75.41 टक्के, दाग खडपाबांध प्रभाग 5 मध्ये 75.82 टक्के, खडपाबांध प्रभाग 6 मध्ये 77.07 टक्के, वारखंडे प्रभाग 8 मध्ये 75.19 टक्के, कुरतरकरनगर, सदर, काझीवाडा प्रभाग 9 मध्ये 68.72 टक्के, दुर्गाभाट वरचा बाजार प्रभाग 10 मध्ये 75.97 टक्के, पंडितवाडा प्रभाग 11 मध्ये 74.18 टक्के, सिल्वानगर, ज्योफिलनर प्रभाग 12 मध्ये 72.98 टक्के, शांतीनगर, दुर्गाभाट, तळे प्रभाग 14 मध्ये 78.95 टक्के तर शांतीनगर, सदर, दुर्गाभाट प्रभाग 15 मध्ये 70.71 टक्के मतदान झाले.
सेंट मेरी मतदान केंद्राबाबत तक्रार
एकूण 13 प्रभागांसाठी 22 बुथ व नऊ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. त्यापैकी पंडितवाडा प्रभाग 11 व सिल्वानगर ज्योफिलनगर प्रभाग 12 साठी सेंट मेरी हायस्कूलमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. हे केंद्र उंचावर असलेल्या व तेथे बऱ्याच पायऱ्या चढून जाव्या लागत असल्याने ज्येष्ठ व वयस्क मतदारांना मतदानाचा हक्क बजावताना बराच त्रास झाला. काही मतदारांनी या त्रासापोटी मतदान करणे टाळले. या प्रकाराबद्दल सर्वच उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी काही उमेदवार व मतदारांनी केली आहे.









