पहिल्याच दिवशी प्रतिसाद : विमानसेवा पूर्ववत झाल्याने समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
मागील 4 ते 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या बेळगाव-पुणे या विमानसेवेला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. पहिल्याच दिवशी 74 प्रवाशांनी पुणे-बेळगाव-पुणे असा विमान प्रवास केला. विमानसेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
अलायन्स एअरने पुणे-बेळगाव-बेंगळूर या मार्गावर विमानफेरी सुरू ठेवली होती. परंतु तांत्रिक कारणाने यातील बेळगाव-बेंगळूर या मार्गावरील फेरी रद्द केली. काही दिवसातच पुणे-बेळगाव ही विमानफेरीही तांत्रिक कारण देत अलायन्सने बंद केली. परंतु ही फेरी उडान 3 अंतर्गत मंजूर असल्याने ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात होती.
अखेर 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवार दि. 12 पासून विमानफेरी पूर्ववत झाली. पहिल्या दिवशी पुण्यावरून 36 प्रवासी बेळगावमध्ये दाखल झाले तर 38 प्रवासी बेळगाववरून पुण्याला गेले. लॉकडाऊननंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असून येत्या काळात प्रवासी संख्येत वाढ होईल, असा अंदाज बेळगाव विमानतळ प्रशासनाला आहे.









