वृत्तसंस्था/ कोलकाता
जिंदाल स्टेनलेस कंपनीने जून 2023 अखेरच्या तिमाहीमध्ये 737 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये वार्षिक तत्वावर पाहता कंपनीने नफ्यात 45 टक्के इतकी वाढ नोंदली आहे. मागच्या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये 507 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. कंपनीचे एकत्रित उत्पन्न याच अवधीमध्ये वाढीसह 10 हजार 227 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागच्या वर्षी याच अवधीमध्ये 8 हजार 142 कोटी रुपयांचे उत्पन्न कंपनीने प्राप्त केले होते. व्यवसाय वाढीसह उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्यासंदर्भात कंपनीने अलीकडे पावले उचलली आहेत. यामुळेच कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ दिसून येत आहे. स्थानिक बाजारामध्ये मागणीची पूर्तता करण्यासोबतच निर्यातीवरही लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे जिंदाल स्टेनलेसचे व्यवस्थापकीय संचालक अभ्युदय जिंदाल यांनी म्हटले आहे.









