ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अमृता फडणवीस धमकी आणि लाच प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने 733 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात अनिल जयसिंघानी, त्यांची मुलगी अनिक्षा आणि चुलत भाऊ निर्मल यांचा आरोपी म्हणून उल्लेख आहे. या आरोपपत्रात 13 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
अनिल जयसिंघानी हा क्रिकेट बुकी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, तो मागील सात वर्ष फरार होता. त्यामुळे त्याची मुलगी अनिक्षाने फॅशन डिझायनर असल्याचे सांगून अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधत गुन्हेगारी प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी मदतीची मागणी केली. यासाठी तिने अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच ऑफर केली होती. तसेच बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप अमृता फडणवीस यांना पाठवून त्याआधारे ब्लॅकमेल करीत त्यांनाच 10 कोटींची खंडणी मागितली, असा आरोप करीत फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यावरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आधी अनिक्षा व नंतर वडील अनिल जयसिंघानीला अटक केली.
या संदर्भात तपास करत असताना पोलिसांनी सुरुवातीला भादवि प्रतिबंधक कायद्याच्या कलम 8 (भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने, सार्वजनिक सेवकावर प्रभाव पाडण्यासाठी) आणि 12 (कलम 7 किंवा 11 मध्ये परिभाषित केलेल्या गुन्ह्यांना उत्तेजन देण्यासाठी शिक्षा) आणि 120 (ब) कट रचणे अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, यात नंतर कलम 385 (खंडणी) देखील जोडण्यात आला. त्यानंतर आता तपास अधिकारी एसीपी रवी सरदेसाई यांनी 733 पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात पोलिसांनी 13 साक्षीदारांचा उल्लेख केला आहे. आरोपींविरोधात आणखी काही पुरावे आढळल्यास पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.