क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची विधानसभेत माहिती
प्रतिनिधी / पणजी
बर्लिन दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून दिलेल्या गोव्यातील दिव्यांग क्रीडापटूंना येत्या गणेशचतुर्थीपूर्वी रु. 73 लाखाची रोख बक्षिसे सरकारतर्फे देण्यात येणार असल्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केले. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी या दिव्यांग खेळाडूंचा प्रश्न मांडला होता. त्यांनी बर्लिन ऑलिम्पिकमध्ये देशाला 19 पदके मिळवून दिली. त्यांना काहीतरी मदत करा, अशी मागणी आलेमांव यांनी केली. त्यांना सरकारने कोणतेही अर्थ सहाय्य दिले नाही म्हणून आलेमांव यांनी सरकारवर टीका केली, त्यावर उत्तर देताना गावडे म्हणाले की, त्यांची संघटना क्रीडाखात्याकडे नोंद नाही. तशी नोंदणी असेल तरच आर्थिक अनुदान देता येणे शक्य आहे. नोंदणीचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले तर सर्व प्रकारचे सहकार्य देता येईल असे सांगून त्यांच्या संघटनेने क्रीडा खात्याकडे नोंदणी करावी, अशी सूचना गावडे यांनी केली.
आमदार जीत आरोलकर यांनी मोरजीतील मैदानाचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्याची तपासणी करुन तो स्टँड काढतो, तसेच मैदानाची दुरुस्ती करतो, असे आश्वासन गावडे यांनी दिले.









