ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर मागील आठ महिन्यात 729 अपघात झाले आहेत. यामध्ये तब्बल 101 जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्ग पोलीस अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांनी ही माहिती दिली आहे.
सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर 11 डिसेंबर 2022 ते 31 जुलै 2023 या काळात 729 अपघात झाले. त्यामधील 242 अपघात हे चालकाला लागली डुलकी लागल्याने झाले. यात 44 जणांचा मृत्यू झाला. वाहनांच्या पुढे प्राणी आल्यामुळे 83 अपघात झाले, यात एकाचा मृत्यू तर 25 जण जखमी झाले. अतिवेगात वाहन चालवल्याने 128 अपघात झाले आहेत. यांत्रिकी बिघाडामुळे 27 अपघात झाले असून, त्यापैकी 11 मध्ये कुणीही जखमी झाले नाही. नागपूर रेंजमध्ये एकूण 451 अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये सर्वाधिक 67 जणांचा मृत्यू झाला. यातही बुलडाणा आणि वाशिम टप्प्यात अपघात व अपघात मृत्यू प्रमाण जास्त आहे.
729 अपघातांपैकी 338 अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. तर 391 किरकोळ व गंभीर अपघातात 101 मृत्यू व 748 प्रवासी जखमी झाले आहेत. या महामार्गावर एकूण 101 लोकांचा बळी गेला आहे. यापैकी 53 जणांचा मृत्यू हा रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान झालेल्या अपघातात झाला आहे.








