पुणे / प्रतिनिधी :
पावसाने ओढ दिल्याने राज्याकरिता ऑगस्टचा पंधरवडा कोरडाच गेला असून, मोठय़ा प्रमाणात तूट नोंदविण्यात आली आहे. 1 ऑगस्ट ते 17 ऑगस्टदरम्यान उणे 72 टक्के पाऊस झाला असून, अवर्षणाची स्थिती महाराष्ट्राने गाठली आहे. त्यामुळे काही भागांत दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
जुलैमध्ये धुवॉंधार पाऊस झाल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ देण्यात सुरुवात केली आहे. ऑगस्टमध्ये देशभरात कमी पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. कोणतीही पोषक स्थिती नसल्याने सध्या राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय नाही. 17 ऑगस्टपर्यंत साधारणपणे 169.20 मिमी इतका पाऊस होत असतो. मात्र, केवळ 47.80 मिमी इतक्या पावसाची नोंद राज्यात झाली आहे.
पश्चिम, दक्षिण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह सबंध राज्य सध्या अवर्षणाच्या स्थितीत आहे. मागच्या 17 दिवसांमध्ये 36 पैकी कोणत्याही जिल्हय़ात पावसाने सरासरी गाठलेली नाही. सर्वत्रच सरासरीपेक्षा कितीतरी कमी पावसाची नोंद झाल्याने शेतीपुढील संकटात वाढ झाली आहे. राज्यात सध्या दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याचे दिसत आहे.
कोकण, प. महाराष्ट्र उण्यातच
महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा जिल्हय़ांची स्थिती पाहता या पंधरवडय़ात रत्नागिरी, कोल्हापूर जिल्हय़ात उणे पावसाचीच नोंद झाली आहे. रत्नागिरी उणे 57, सिंधुदुर्ग उणे 61, कोल्हापूर उणे 57, सांगली उणे 76, सातारा उणे 65, पुणे उणे 69, सोलापूर उणे 87 असे पावसाचे प्रमाण असल्याचे आकडेवारीरून दिसत आहे. तर उर्वरित जिल्हय़ांमध्येही अवर्षणाची स्थिती आहे. पालघरमध्ये उणे 73, मुंबई उणे 92, मुंबई उपनगर उणे 91, ठाणे उणे 69, रायगड उणे 69, नाशिक उणे 49, नगर उणे 86, उस्मानाबाद उणे 85, लातूर उणे 92, बीड उणे 92, जालना उणे 89, छत्रपती संभाजीनगर उणे 80, जळगाव उणे 74, धुळे उणे 62, नंदुरबार उणे 65, नांदेड उणे 88, परभणी उणे 94, हिंगोली उणे 92, बुलढाणा 71, नागपूर उणे 69, गडचिरोली उणे 70, चंद्रपूर 84 असे पावसाचे प्रमाण दिसत आहे.
मान्सून बरसणार
उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे. यामुळे राज्यातील मान्सूनला संजीवनी मिळणार आहे. राज्यात हळूहळू पावसाचे प्रमाण वाढणार असून, 18 ते 20 ऑगस्टदरम्यान विदर्भ, मराठवाडा तसेच कोकणात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
देशातील पावसातही घट
उत्तर भारतात सध्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, इतरत्र पावसाने ओढ दिली आहे. 1 जून ते 15 ऑगस्टदरम्यान उणे 4.53 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे.
ऑगस्टमधील पावसाची स्थिती
कोल्हापूर उणे 57
सांगली उणे 76
सातारा उणे 65
सोलापूर उणे 87
रत्नागिरी उणे 57
सिंधुदुर्ग उणे 61








