तीन माजी मुख्यमंत्री लोकसभेच्या रिंगणात, महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीकरता भाजपने उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जारी करत धक्कातंत्राचा वापर केला आहे. या यादीत 10 राज्यांमधील एकूण 72 मतदारसंघांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत अनेक दिग्गज नेत्यांची नावे सामील असली तरीही कित्येक विद्यमान खासदारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. नागपूर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीनन गडकरी यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. सांगली मतदारसंघात खासदार संजयकाका पाटील, तर माढा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरच पक्षाने पुन्हा विश्वास दाखविला आहे. एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. यामुळे खडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे करनाल तर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत हे हरिद्वार मतदारसंघात भाजपचे उमेदवार असणार आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना हावेरी मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याचबरोबर पूर्व दिल्लीत हर्ष मल्होत्रा यांना तर उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघात योगेंद्र चंदोलिया हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. भाजपकडून आता दिल्लीतील सातही मतदारसंघांचे उमेदवार जाहीर झाले आहेत.
भाजपच्या दुसऱ्या यादीत गुजरातमधील 7, दिल्लीचे 2, हरियाणाचे 6, हिमाचल प्रदेशचे 2, कर्नाटकातील 20, उत्तराखंडचे 2, महाराष्ट्रातील 20, तेलंगणातील 6, मध्यप्रदेशातील 5 आणि त्रिपुरातील एका उमेदवाराचे नाव सामील आहे. दादर आणि नागरा हवेलीचा उमेदवारही पक्षाने जाहीर केला आहे. भाजपने यापूर्वी पहिल्या यादीत 195 उमेदवारांची नावे जाहीर केली होती.
महाराष्ट्रासंबंधी होती उत्सुकता
भाजपच्या दुसऱ्या यादीकडे महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून विशेष नजर होती. अलिकडेच शिवसेना (युबीटी)चे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत:च्या पक्षात येण्याची ऑफर जाहीरपणे दिली होती. गडकरी यांनी या ऑफरला हास्यास्पद ठरविले होते. भाजपने दुसऱ्या यादीत गडकरी यांचे नाव सामील करत सर्व अफवांना विराम दिला आहे. भाजपने केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे. सांगली मतदारसंघात विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे.
मुनगंटीवार लोकसभेच्या रिंगणात
भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर केली असून यात राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव सामील आहे. मुनगंटीवार हे चंद्रपूरमधून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. मुनगंटीवर हे लोकसभा निवडणूक लढविण्यास नाइच्छुक असल्याची चर्चा होती.
पुण्यात मोहोळ यांना संधी
भाजपने पुण्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे आता पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. पंकजा मुंडे आता भाजपने एकप्रकारे राजकीय पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेली युती पाहता वाद टाळण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. जळगाव मतदारसंघात उन्मेष पाटील यांच्याजागी स्मिता वाघ यांना भाजपने संधी दिली आहे. तर मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात मनोज कोटक यांच्याऐवजी पक्षाने मिहिर कोटेचा यांना तिकीट दिले आहे. भाजपची उमेदवारांची यादी पाहता महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला राज्यातील किती जागा येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांची यादी
उमेदवार मतदारसंघ
हिना गावित नंदुरबार
सुभाष भामरे धुळे
स्मिता वाघ जळगाव
रक्षा खडसे रावेर
अनुप धोत्रे अकोला
रामदास तडस वर्धा
नितीन गडकरी नागपूर
सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर
प्रतापराव चिखलीकर नांदेड
रावसाहेब दानवे जालना
भारती पवार दिंडोरी
कपिल पाटील भिवंडी
पियूष गोयल उत्तर मुंबई
मिहिर कोटेचा मुंबई उत्तरपूर्व
मुरलीधर मोहोळ पुणे
सुजय विखे पाटील अहमदनगर
पंकजा मुंडे बीड
सुधाकर श्रृंगारे लातूर
रणजीतसिंह नाईक निंबाळकर माढा
संजयकाका पाटील सांगली
हमीरपूरमध्ये अनुराग ठाकूर
भाजपच्या नव्या यादीत फरिदाबादमधून कृष्णपाल गुर्जर यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळाले आहे. पौडी गढवाल मतदारसंघात अनिल बलूनी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हरियाणाच्या सिरसामध्ये अशोक तंवर, गुरुग्राममधून राव इंद्रजीत सिंह, फरिदाबाद येथे कृष्णपाल गुर्जर निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरमध्ये अनुराग ठाकूर तर शिमला मतदारसंघात सुरेश कुमार कश्यप भाजपचे उमेदवार असतील. हिमाचल प्रदेशात भाजपने पुन्हा जुन्या चेहऱ्यांवरच विश्वास व्यक्त केला आहे.
छिंदवाडामध्ये विवेक साहू
मध्यप्रदेशातील आणखी 5 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. यात बालाघाटमध्ये भारती पारधी यांना संधी देण्यात आली आहे. तर बहुचर्चित छिंदवाडा मतदारसंघात विवेक बंटी साहू हे काँग्रेस नेते कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवतील. छिंदवाडा मतदारसंघ यावेळी हायप्रोफाईल ठरणार असल्याचे मानले जातेय. उज्जैनमध्ये अनिल फिरोजिया, धार येथे सावित्री ठाकूर आणि इंदोर मतदारसंघात शंकर लालवानी हे पक्षाचे उमेदवार असतील. मध्यप्रदेशातील सर्व जागांसाठी भाजपचे उमेदवार आता घोषित झाले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली चर्चा
भाजपकडून उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरुप देण्यासाठी सोमवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती. भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जगतप्रकाश न•ा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत समितीचे अन्य सदस्य सामील झाले होते. या बैठकीत आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि हरियाणातील उमेदवारांसंबंधी चर्चा झाली होती. भाजपकडून आता लवकरच आंध्रप्रदेशातील उमेदवार जाहीर होणार असल्याचे मानले जात आहे.









