वृत्तसंस्था/ गॅले
लंकेचा नवोदित फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात गेली 71 वर्षे अबाधित राहिलेला विश्वविक्रम मोडीत काढला. आयर्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत 31 वर्षीय जयसूर्याने आपल्या सातव्या कसोटीत बळींचे अर्धशतक पूर्ण करत नवा विश्वविक्रम नोंदवला. यापूर्वी हा विश्वविक्रम विंडीजचे माजी फिरकी गोलंदाज अल्फ व्हॅलेंटाईन यांच्या नावावर नोंदवला गेला होता. लंकेने गॅलेची दुसरी कसोटी 1 डाव आणि 10 धावांनी जिंकली.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत यजमान लंकेने आयर्लंडचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. या दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस काढला गेला. या संपूर्ण कसोटीत 1400 धावा नोंदवल्या गेल्या. आयर्लंडने कसोटी क्रिकेटमधील आपली सर्वोच्च धावसंख्या या सामन्यातील पहिल्या डावात (492) नोंदवली. त्यानंतर लंकेने पहिल्या डावात 704 धावांचा डेंगर उभा केला. त्यांच्या दोन फलंदाजांनी द्विशतके तर दोन फलंदाजांनी शतके झळकवली. निशान मधुश्काने 205 तर कुशल मेंडिस 245 त्याचप्रमाणे अँजेलो मॅथ्यूजने नाबाद 100 आणि कर्णधार करुणारत्ने 115 धावा झळकवल्या.

आयर्लंडने 2 बाद 54 या धावसंख्येवरून शुक्रवारी खेळाच्या शेवटच्या दिवसाला प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 77.3 षटकात 202 धावात आटोपला. टेक्टरने 3 षटकार आणि 8 चौकारासह 85, कर्णधार बलबर्नीने 5 चौकारासह 46, तसेच मूरने 19, मॅकॉलमने 10, टकरने 13, कॅम्फरने 12 व मॅकब्राईनने 10 धावा केल्या. लंकेतर्फे रमेश मेंडिसने 64 धावात 5 तर असिथा फर्नांडोने 30 धावात 3 तसेच प्रभात जयसूर्याने 88 धावात 2 गडी बाद केले. लंकेने ही दुसरी कसोटी एक डाव आणि 10 धावांनी जिंकली. या मालिकेत कुसल मेंडिसला मालिकावीर तर प्रभात जयसूर्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात प्रभात जयसुर्याने आयर्लंडच्या पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 असे एकूण 7 बळी घेतले. जयसुर्याने आतापर्यंत 6 वेळा एका डावात 5 गडी बाद केले आहेत. तसेच त्याने एका सामन्यात तीन वेळा 10 बळी मिळवले आहेत.
जयसूर्याचा विक्रम
31 वर्षीय फिरकी गोलंदाज प्रभात जयसुर्याने जुलै 2022 साली आपले कसोटी पदार्पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या कसोटी पदार्पणात 177 धावात 12 गडी बाद केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजामध्ये जयसूर्या चौथ्या स्थानावर आहे. जयसूर्याने 7 कसोटी सामन्यात 50 गडी बाद करण्याचा नवा विश्वविक्रम कसोटी क्रिकेटमध्ये करताना विंडीजच्या अल्फ व्हॅलेंटाईन यांनी 1959 साली नोंदवलेल्या 8 सामन्यातील जलद 50 बळींचा विश्वविक्रम मागे टाकला. विंडीजच्या व्हॅलेंटाईन यांनी 1950 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चार सामन्यात 33 बळी नेंदवत विंडीजला पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका विजय मिळवून दिला होता. त्यानंतर व्हॅलेंटाईन यांनी 1951-52 च्या कालावधी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील चौथ्या कसोटीत बळींचे अर्धशतक झळकवले होते. व्हॅलेंटाईन यांनी 8 सामन्यात नोंदवलेला हा विश्वविक्रम 71 वर्षे अबाधित राहिला होता. पण आता तो प्रभात जयसूर्याकडून मोडीत निघाला. इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जॉर्ज लोमन यांनी 1896 साली 16 कसोटीत बळींचे शतक पूर्ण केले होते. लोमन यांचा कसोटी क्रिकेटमधील जलद बळीच्या शतकाचा विक्रम अद्याप अबाधित आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे क्लॅरी ग्रिमेट आणि पाकच्या यासीर शहा यांनी 17 कसोटीत बळींचे शतक झळकवले होते. जयसूर्याने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या व्हरनॉन फिलँडर आणि इंग्लंडच्या टॉम रिचर्डसन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. फिलँडर आणि रिचर्डसन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सात सामन्यात 50 बळी नोंदवले आहेत. फिलँडरने हा विक्रम 2012 साली तर इंग्लंडच्या टॉम रिचर्डसन यांनी हा विक्रम 1896 साली केला होता.
संक्षिप्त धावफलक : आयर्लंड प. डाव 145.3 षटकात सर्वबाद 492, लंका प. डाव 151 षटकात 3 बाद 704 डाव घोषित, आयर्लंड दु. डाव 77.3 षटकात सर्वबाद 202 (टेक्टर 85, मॅकॉलम 10, मूर 19, बलबर्नी 46, टकर 13, कॅम्फर 12, मॅकब्राईन 10, रमेश मेंडिस 5-64, असिथा फर्नांडो 3-30, प्रभात जयसूर्या 2-88).









