मिझोरममध्ये 77 टक्क्यांहून अधिक मतदान : निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला
वृत्तसंस्था/ रायपूर, आयझोल
दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील 20 जागांकरिता तर मिझोरममधील सर्व 40 जागांवर मतदान पार पडले आहे. मंगळवारी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार छत्तीसगडमध्ये एकीकडे 71 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर मिझोरममध्ये 77.39 टक्के मतदान झाले आहे. याचबरोबर दोन्ही राज्यांमधील 397 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे.
छत्तीसगडच्या 90 पैकी 20 जागांकरिता मंगळवारी मतदान झाले. यात बस्तर विभागातील 12 मतदारसंघ तर दुर्ग विभागातील 8 मतदारसंघांचा समावेश होता. निवडणूक आयोगानुसार छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 71 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. तर या 20 मतदारसंघांमध्ये 2018 च्या निवडणुकीत एकूण 77.23 टक्के मतदान झाले होते.
छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मतदान खैरागड-छुईखदान-गंडई जिल्ह्यात झाले आहे. तर सर्वात कमी मतदान बिजापूर जिल्ह्यात झाले आहे. तेथे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केवळ 40.98 टक्केच मतदान झाले. तर उत्तर-बस्तर-कांकेर, राजनांदगाव, मोहला मानपूर, अंबागढ चौकी, कोंडागाव जिल्ह्यात 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. तर बस्तर-जगदलपूर, कबीरधाममध्ये 70 टक्क्यांहून मतदान झाले आहे.
राजनांदगाव मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह मैदानात आहेत. या मतदारसंघात 75.1 टक्के मतदान झाले आहे. 2018 च्या निवडणुकीत येथे 63.18 टक्के मतदान झाले होते. म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत सुमारे 12 टक्के अधिक मतदान झाले आहे.
ईशान्येतील राज्य मिझोरममधील मतदान मंगळवारी संपुष्टात आले आहे. मागील निवडणुकीच्या जवळपास यंदाही मतदान झाले आहे. राज्यातील सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ आयझोल पूर्व-1 असून येथून मुख्यमंत्री जोरामथंगा मैदानात आहेत. या मतदारसंघात 65.97 टक्के मतदान झाले आहे. यावेळी सेरछिप मतदारसंघात सर्वाधिक 83.73 टक्के मतदान नोंदले गेले आहे. यानंतर तुइकुम मतदारसंघात 83.07 टक्के आणि सेर्लुइt मतदारसंघात 83.03 टक्के मतदान झाले आहे.









