नैर्त्रुत्य रेल्वेच्या बैठकीत सरव्यवस्थापकांची माहिती : वर्षभरात 83 स्पेशल रेल्वे सुरू
बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेची विभागीय बैठक मंगळवारी हुबळी येथील मुख्यालयात पार पडली. या बैठकीला रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव किशोर उपस्थित होते. नैर्त्रुत्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेली विकासकामे, त्याचबरोबर प्रवाशांच्या मागण्या याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. गोवा व कर्नाटकातील अनेक लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये नैर्त्रुत्य रेल्वेने प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकी-मध्येही उल्लेखनीय सेवा बजावली आहे. वास्को, म्हैसूर, हुबळी यासह 50 रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे. मागील वर्षभरात 83 स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आल्या. त्याचबरोबर 1,798 डबे एक्स्प्रेसला जोडण्यात आले. तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार सण-उत्सव आणि सार्वजनिक सुट्यांच्या काळात जादा रेल्वे सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत नैर्त्रुत्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात 71 टक्के रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. 228 किलोमीटरचा नवा रेल्वेमार्ग त्याचबरोबर 874 किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. दक्षिण भारतामध्ये वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करून प्रवाशांची सोय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला खासदार नारायण करगाप्पा, गोव्याचे मंत्री निलेश काब्राल, त्याचबरोबर पर्यावरणवादी व कर्नाटक सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. रेल्वेचे अतिरिक्त सरव्यवस्थापक सुब्बाराव यांनी आभार मानले.









