शिमोगा, बेळगाव, चित्रदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक घटना ; आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात प्रमाण जास्त
बेळगाव : कर्नाटकमध्ये बालविवाहांची प्रकरणे अद्यापही मोठ्या प्रमाणात घडत असून 2024-25 या कालावधीत तब्बल 700 प्रकरणांची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 3% घट झाली असली तरीही हा आकडा अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार शिवमोगा, बेळगाव आणि चित्रदुर्ग हे जिल्हे बालविवाहांच्या घटनांमध्ये अव्वल ठरले आहेत. म्हैसूर, मंड्या आणि बागलकोट जिल्ह्यांतही बालविवाहाच्या घटना नोंदविल्या गेल्या आहेत. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार 2023-24 मध्ये राज्यात 719 बालविवाह घडले होते, तर चालू वर्षी एप्रिल ते जून 2025 या तीन महिण्यांतच 211 प्रकरणे नेंदवली गेली आहेत. मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले की, ‘राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हा प्रशासनाला बालविवाह रोखण्यासाठी तातडीने आणि आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केएसआरटीसी व बीएमटीसी बसवरून विशेष जनजागृती मोहीम राबवून समाजात बालविवाहाविषयी जागरुकतीचे प्रयत्न सुरू आहेत.
बालविवाह रोखण्यासाठीच्या दुरूस्ती विधेयकाला मंजुरी
बालविवाह रोखण्यासाठी सरकारने 2025 मध्ये एक दुरूस्ती विधेयक तयार केले असून, त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकात फक्त विवाहच नव्हे तर त्याची तयारी, साखरपुडा किंवा प्रयत्न यांनाही गुन्हा मानण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत पोलिसांना थेट तक्रार नेंदविण्याचा अधिकार नसला तरी बालविवाह झाल्यास पालक व नातेवाईकांविरुद्ध एफआयआर दाखल केला जातो. तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यास लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) लागू करण्यात येतो, असे म्हैसूर बालकल्याण समितीचे अध्यक्ष एम. रविचंद्र यांनी सांगितले.
घटनांना आळा बसण्याची अपेक्षा
बालविवाह वाढण्यामागे पळून जाण्याच्या घटना (एलोमेंट) आणि सामाजिक कलंक याही मोठ्या कारणांपैकी आहेत. अल्पवयीन मुलं-मुली नातेसंबंधात आहेत हे लक्षात आल्यावर पालक समाजाच्या भीतीपोटी त्यांचे लवकर लग्न लावून देतात, असे मत निरीक्षण तज्ञांनी व्यक्त केले. राज्य सरकारच्या या उपाययोजनांमुळे बालविवाहांच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे, मात्र समाजानेही याविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.










