रुग्णसंख्या पोहोचली तीनवर : तालुक्यात भीतीचे वातावरण
बेळगाव : येळ्ळूर, निलजी पाठोपाठ आता बेनकनहळ्ळी येथील एका 70 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान बुधवारी झाले आहे. त्यामुळे बाधित रुग्णांवर एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. प्रशासन नागरिकांना घाबरू नका, काळजी करू नका म्हणत असले तरी कोरोनाची लागण हळूहळू वाढत चालली आहे. हा कोरोना तितका धोकादायक नसला तरी सर्वांनी काळजी घेणे तितकेच जरुरीचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य खाते अलर्ट झाले असून संशयित रुग्णांची चाचणी केली जात आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी येळ्ळूर येथील एका 25 वर्षीय गर्भवतीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यापाठोपाठ निलजी येथील एका 75 वर्षीय वृद्धालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दोघाही बाधितांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात असतानाच बुधवारी तालुक्यातील बेनकनहळ्ळी येथील एका 70 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. सदर वृद्ध घरात पडल्याने त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी केली असता लागण झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बेळगाव जिल्ह्यात केवळ बेळगाव तालुक्यातच तीन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या गावात रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी येळ्ळूर आणि निलजी येथे आरोग्य खात्याच्यावतीने सर्व्हे करण्यात आला होता. बेनकनहळ्ळी येथे रुग्ण आढळल्याने त्या गावातही आरोग्य विभागातर्फे सर्व्हे केला जाणार आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालल्याने आरोग्य खात्याची झोप उडाली आहे. सरकारने काही नियमावली घालून दिल्या असून त्याचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. हा कोरोना तितका धोकादायक नसला तरी खबरदारी बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे.









