आमदार विजय सरदेसाई यांची माहिती : ‘युनिटी मॉल’ मेरशी, पणजीसाठी धोक्याचा,राष्ट्रीय हरित लवादाकडे जाण्याचा इशारा
पणजी : मेरशी येथे येऊ घातलेल्या ‘युनिटी मॉल’ या प्रकल्पामुळे या भागातील पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे. या प्रकल्पामुळे तब्बल 70 हजार चौ. मी. खारफुटी धोक्यात येणार आहे. त्याशिवाय 25 हजार चौ. मी. भात शेतीचीही जमीनही नष्ट होणार आहे, याकडे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे. हे पर्यावरणीय धोके लक्षात घेऊन सरकारने या प्रकल्पाची जागा जर बदलली नाही तर राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसेल, असा इशारा सरदेसाई यांनी दिला आहे.
ग्रामीण विकास यंत्रणेच्या अखत्यारित असलेली ही जमीन पर्यटन खात्याला हा प्रकल्प विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय नुकताच मंत्रीमंडळ बैठकीत संमत झाला असून या र्पाश्र्वभूमीवर सरदेसाई यांनी ही भीती व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे सरकारला डोळ्यांसमोर मोठा आर्थिक फायदा दिसत असला तरी पर्यावरणाची जी हानी होणार ती त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असून त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे प्रत्यक्षात घाट्याचा सौदा आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. या भागातील स्थानिक लोकांवरही याचा विपरित परिणाम होणार अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
ज्या जागेत हा प्रकल्प येऊ घातला आहे तो सखल भातशेतीचा भाग आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील खारफुटी क्षेत्राचा त्यात समावेश आहे. समुद्रसपाटीपासून 5 मीटरच्या उंचीवर असलेले हे क्षेत्र पुराच्यावेळी बफर झोन म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ज्यामुळे या भागातील लोकांचे हे क्षेत्र पूर येण्यापासून संरक्षण कऊ शकते. या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम आल्यास ते या भागासाठीच नव्हे तर पणजीमध्येही पूरस्थिती निर्माण कऊ शकते. याची दखल घेऊन सरकारने हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे. सध्याच्या निवडलेल्या जागेवर प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्पाला पुढील कारणांसाठी ठामपणे विरोध करताना या प्रकल्पामुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होणार आहे. या प्रकल्पामुळे पुराचा धोका वाढणार आहे आणि त्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराला बाधा येईल, अशी भीती विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
मेरशी भागाचा पर्यावरणाचा विध्वंस थांबवा
मागच्या दोन वर्षांत मेरशी भागातील खारफुटी मोठ्या प्रमाणावर विषबाधा कऊन नष्ट केली आहे, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधून ही खारफुटी पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे. खारफुटी किनारपट्टी स्थिरीकरण आणि जल शुद्धीकरण, तसेच वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींचे निवासस्थान म्हणून देखील काम करते. त्याचा नाश हा पर्यावरणाच्या विध्वंसासारखाच असेल, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.









