भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यास होणार मदत : अद्याप 123 तलावांचे काम पूर्ण करण्यासाठी धडपड
बेळगाव : जिल्हा पंचायत व ग्राम पंचायतीच्या सहयोगाने जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेतून अमृत सरोवर योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या 144 तलावांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर या तलावांच्या माध्यमातून तहान भागविण्याची सोय होणार आहे, असे जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी, याबरोबरच पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीमध्ये झिरपण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने गावागावात असणाऱ्या तलावांचा विकास करण्यात आला आहे. अमृत सरोवर योजनेंतर्गत तलावांची खोदाई करून त्यातील गाळ काढण्यात आला आहे. पाणीसाठा व्हावा यासाठी बांध बांधण्यात आले आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने पिके करपत आहेत. याचबरोबर सर्वत्र पाण्याची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी अमृत सरोवरातून विकास करण्यात आलेल्या तलावांमध्ये यंदा 70 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. पावसाअभावी हे तलाव भरले नसल्याने सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा साठा भविष्यात उपयोगी ठरणार आहे. ग्राम पंचायतींनी या पाण्याचा योग्यप्रकारे उपयोग करून भविष्यातील समस्येवर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे, असे जिल्हा पंचायत योजना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये 267 तलाव
अमृत सरोवर योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये 267 तलावांचे काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी 144 तलावांचे काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झालेल्या तलावांवर नुकतेच ध्वजारोहण करून तलावांचे नामकरण करण्यात आले आहे. तर 123 तलावांचे काम अपूर्ण असून वेगवेगळ्या टप्प्यात काम सुरू आहे. लवकरच या तलावांचेही काम पूर्ण केले जाईल, असे जिल्हा पंचायतकडून सांगण्यात येत आहे.









