लोणावळा / प्रतिनिधी :
देशातील 70 टक्के जनतेने भाजपाला नाकारले आहे. देशाचा विचार करता काही राज्ये वगळता इतर सर्वत्र भाजपाविरहित सरकार आहे. इंदिरा गांधी शक्तीशाली असतानादेखील आणीबाणी लागू केल्यानंतर जनतेने त्यांना नाकारत जनता पार्टीच्या हातात देशाची सत्ता दिली. ते आताही होऊ शकते, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मणीपूरमधील स्थिती बिघडत असून, देशातील सामाजिक अशांतता घातक असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश डाॅक्टर सेलच्या वतीने लोणावळ्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी शरद पवार यांनी देशात व राज्यात निर्माण झालेल्या अशांततेचा मुद्दा उपस्थित करत, वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या डाॅक्टर सेलने याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढे यावे, असा सल्ला दिला.
पवार म्हणाले, आज देशात लोकांच्या घरावर हल्ले होत आहेत, सरकारी अधिकार्यांच्या घरावर हल्ले होत आहेत. आम्ही देशाचे नागरिक आहोत की नाही, असा प्रश्न संरक्षण खात्यातील एका निवृत्त अधिकार्याने मणीपूरमध्ये विचारला. अनेक अधिकारी व नागरिक हा प्रश्न उपस्थित करत आहेत. देशात निर्माण होत असलेली ही सामाजिक अशांतता देशाच्या दृष्टीने घातक आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारची कानउघडणी केली.
देशातील नागरिक हुशार आहे त्यांच्यासमोर योग्य वस्तुस्थिती मांडली गेली पाहिजे. राजकारण केवळ सत्तेसाठी करायचे नसते, समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्यासाठी करायचे असते, असेही त्यांनी सुनावले. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, महाराष्ट्र प्रदेश डाॅक्टर सेलचे अध्यक्ष डाॅ. सुनील जगताप, आमदार निलेश लंके, आमदार सुनील शेळके, नरेंद्र काळे, विजय जाधव, लोंढे, बसवराज पाटील आदी मान्यवर या उपस्थित होते.








