कोल्हापूर :
गत पाच वर्षांत दुभत्या जनावरांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. या व्यवसायाकडे अनेकजण वळत असल्याने जनावरांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत पशुधन विकास अधिकारी व मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी प्रलंबित होती. या मागणीचा विचार करून पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
कोल्हापुरात पशुधन विभागात 70 पशुधन विकास अधिकारी व 18 सहायक आयुक्तांची भरती केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या बळकटी देण्यासाठी पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2 हजार 795 पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त पशुसंवर्धन या संवर्गातील 311 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कडून प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 20 जूनपर्यंत पात्र इच्छुक अर्ज करता येणार आहेत.
- 20 जून पर्यंत अर्ज करण्याचे आदेश
महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून पशुसंवर्धन सहायक आयुक्त या संवर्गातील 311 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी 20 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेनतंर पशुसंवर्धन विभागाला सक्षम व नवीन अधिकारी मिळणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे कामाला गती येणार आहे. व शेतकऱ्यांच्या अडचणींवर मात करण्यात येणार आहे.रिक्त पदांमुळे पशुपालक, शेतकरी यांना सेवा देण्यात अडचणी येत आहेत.
–जिल्ह्यातील दुभती जनावरे : सुमारे 8 लाखांवर
–एकूण पशुवैद्यक दवाखाने : 178
–एकूण पशुधन विकास अधिकारी : 110
–सध्या भरती होणारे अधिकारी : 70
–सहाय्यक आयुक्तांची होणारी भरती : 18








