मिरजहून उगार खुर्दला नेताना कारवाई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी
बेळगाव : कागवाडजवळ बुधवारी 70 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करताना एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड सापडली असून अधिकाऱ्यांनी कारसह रक्कम ताब्यात घेतली आहे. कागवाड-मिरज रोडवरील चेकपोस्टवर बुधवारी दुपारी मिरजहून कागवाडला आलेले एमएच 11 बीएच 0201 क्रमांकाची इंडिका विस्टा कार अडवून तपासणी केली असता कारमध्ये एक बॅग आढळली. तपास नाक्यावरील अधिकाऱ्यांनी बॅगमध्ये काय आहे? अशी विचारणा केली असता 70 लाख रुपये असल्याचे कारमधील दोघा जणांनी सांगितले. तपास नाक्यावरील सर्व्हिलन्स अधिकाऱ्यांनी बॅग उघडून पाहिले असता त्यामध्ये 70 लाख रुपये आढळून आले. ही रक्कम मिरजहून उगार खुर्दला नेण्यात येत होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कारमध्ये चालकासह तिघे जण होते. ही रक्कम नेण्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे नसल्याने ती ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे चेकपोस्टवर तपासणी वाढविण्यात आली आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीपासून वाहने अडवून तपासणी करण्यात येत होती. ही रक्कम मिरज येथून कोठून आणण्यात आली, उगार खुर्द येथे कोणाला पोहोचविण्यात येत होती? याची चौकशी करण्यात येत आहे.
यरगट्टीजवळ शिलाई मशिन, कुकर जप्त
भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी यरगट्टी (ता. सौंदत्ती) जवळील एका गोदामावर छापा टाकून 3 लाख 52 हजार 705 रुपये किंमतीच्या शिलाई मशिन व कुकर जप्त केले आहेत. कुकर, शिलाई मशिनवर बसवराज रुद्राप्पा पट्टणशेट्टी यांचे चित्र आहे. मुरगोड पोलीस स्थानकात भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.









