भ्रूणहत्या प्रकरणातील नर्सचा पोलीस चौकशीवेळी गौप्यस्फोट
प्रतिनिधी/ बेंगळूर
भ्रूणलिंग निदान आणि भ्रूणहत्या प्रकरणाच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर दिवसेंदिवस धक्कादायक बाबी उजेडात येत आहेत. भ्रूणहत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. महिन्याला 70 महिलांचे गर्भपात करण्यात येत होते, तर महिन्याला किमान दोन प्रकरणांमध्ये 6 महिन्यांच्या अर्भकाची हत्या केली जात होती. सिझेरियनद्वारे सहा महिन्यांचे अर्भक बाहेर काढले जात होते, अशी धक्कादायक कबुली डॉ. चंदन बल्लाळ यांच्या इस्पितळात प्रमुख नर्स म्हणून काम करणाऱ्या मंजुळा हिने दिली आहे.
माता इस्पितळात प्रमुख नर्स म्हणून काम करणाऱ्या मंजुळाने चौकशीवेळी दिलेली माहिती हृदय पिळवटून टाकणारी आहे. आपण महिन्याला किमान दोनदा सहा महिन्यांचे अर्भक बाहेर काढत असे. सहा महिन्यांच्या अर्भकाला आवाज असत नाही. ते बाहेर काढल्यानंतर 5 ते 10 मिनिटांत दगावते. नंतर त्याला पेपरमध्ये गुंडाळून निसारकडे देत होते. निसार ते पेपरमध्ये गुंडाळून कावेरी नदीत फेकून देत होता. 12 आठवड्यांचे भ्रूण गर्भपात करून वैद्यकीय कचऱ्यात फेकून देत होतो. चार दिवसांत ते सडून जात होते, असे भयानक सत्यही मंजुळाने कथन केले आहे.
मागील वर्षापासून मी डॉ. चंदन बल्लाळ यांच्याकडे काम करत होते. महिन्याला 70 गर्भपात केले आहेत. माझ्याआधी हे काम रिझ्मा करत होती. तिच्यानंतर मी देखील हे काम स्वीकारले. सहा महिन्यांचे अर्भकही बाहेर काढले आहे. अर्भकाचा जीव गेल्यानंतर निसार नदीत ते फेकून देत असे. मात्र कोणत्या ठिकाणी फेकायचा, हे ठाऊक नाही. नदी सोडून दुसरीकडे फेकल्यास त्याचे अवशेष सापडण्याची भीती असायची. भ्रूणहत्येनंतर गर्भवती स्त्राrचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असे. तेव्हा तिला इस्पितळात दाखल करणे कठीण व्हायचे. सहा महिन्यांचे अर्भक बाहेर काढण्याचे वेगळेच कारण होते. आमच्याजवळ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारे स्कॅनिंग मशिन नव्हते. काही प्रसंगी भ्रूणाचे लिंग समजत नव्हते. त्यामुळे भ्रूणहत्येसाठी आलेल्या गर्भवतीला महिन्याने पुन्हा येण्यास सांगितले जात होते. त्यामुळे भ्रूणाचे लिंग समजण्यास विलंब झाल्यास सहा महिन्यांनी गर्भपात केला जात होता, असेही तिने सांगितले.
आयुर्वेद डॉक्टराने उघडले नर्सिंग होम
सहा महिन्यांचे अर्भक सिझेरियन पद्धतीने बाहेर काढून टेबलवर ठेवले जात होते. 5 ते 10 मिनिटांनी ते अर्भक मृत होताच ते नदीत फेकून दिले जात होते. सिझेरियनवेळी महिलेला बेशुद्ध केले जात होते. चंदन बल्लाळ एमबीबीएस पूर्ण केलेला डॉक्टरही नाही. त्याने केवळ आयुर्वेद चिकित्सेचे प्रशिक्षण घेतले आहे. अर्हता नसतानाही त्याने नर्सिंग होम उघडले होते, अशी धक्कादायक माहितीही नर्स मंजुळाने चौकशीवेळी दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.









