70 टक्के लोकांनी घराबाहेर असताना सदैव मास्क वापरल्यास कोरोना विषाणू महामारी रोखली जाऊ शकते. संशोधनानुसार कोविड-19 महामारी रोखण्यासाठी किमान 70 टक्के जनतेने सातत्याने मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्कचा वापर कोरोना विषाणूच्या प्रभावीपणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचा दावा संशोधनानंतर करण्यात आला आहे.
फिजिक्स ऑफ फ्लुइड्स या नियतकालिकात प्रकाशित या संशोधनाने फेस मास्कवर करण्यात आलेल्या अध्ययनांचे आकलन केले आणि यानंतर महामारीतज्ञांच्या अहवालांची समीक्षा केली आहे. मास्क विषाणू फैलावणाऱया लोकांची संख्या कमी करतो का हेही पडताळून पाहण्यात आले आहे.
जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. युरोपच्या अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यावर स्थिती बिघडू लागली आहे. याचदरम्यान कोरोनाच्या लसीवरूनही अनेक चांगल्या बातम्या समोर येत आहेत. कोरोनाची लस येईपर्यंत लोकांना निष्काळजीपणा न बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांना सदैव मास्क वापरणे, शारीरिक अंतराचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. लस येईपर्यंत मास्कच सर्वोत्तम उपाय आहे.
अत्याधिक प्रभावी मास्कचा वापर 70 टक्के लोकांनी सदैव केल्यास कोरोना महामारी रोखली जाऊ शकते असे सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीतील तज्ञ संजय कुमार यांच्यासह अन्य वैज्ञानिकांनी म्हटले आहे. साधा मास्कही कोरोना विषाणू फैलावाची गती मंदावू शकतो, असे वैज्ञानिकांची नमूद केले आहे.
एखादा व्यक्ती बोलत असल्यास, शिंकत किंवा खोकत असल्यास तोंडातून द्रवाचे थेंब बाहेर पडत असतात. मोठे थेंब 5-10 मायक्रॉनच्या आकाराचे असतात. तर 5 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे थेंब अधिक धोकादायक असतात, अशी माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे.