वृत्तसंस्था/ हुबळी
2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे सुरू झालेल्या क इलाईट गटातील सामन्यात कर्नाटकाच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबचा पहिला डाव 152 धावांवर आटोपला. त्यानंतर कर्नाटकाने पहिल्या दिवसाअखेर पहिल्या डावात 3 बाद 142 धावा जमवित 10 धावांची आघाडी मिळविली. या सामन्यात कर्नाटकाच्या व्ही. कौशिकने 41 धावांत 7 गडी बाद केले.
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या वधेराने 7 चौकारांसह 44, खोराने 5 चौकारांसह 27, मयांक मार्कंडेने 5 चौकारांसह नाबाद 26, अभिषेक वर्माने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 26 धावा जमविल्या. कर्नाटकातर्फे कौशिकने 41 धावांत 7 तर विशाखने 35 धावांत 2 तसेच रोहित कुमारने 1 गडी बाद केला. त्यानंतर कर्नाटकाने दिवसअखेर पहिल्या डावात 3 बाद 142 धावा जमविल्या. सलामीच्या देवदत्त पडिकलने दमदार फलंदाजी केली. तो 14 चौकारांसह 80 धावांवर खेळत असून मनिष पांडे 13 धावांवर खेळत आहे. कर्णधार अगरवालला खाते उघडता आले नाही. नितीन जोस 8 धावांवर बाद झाला. पंजाबतर्फे पी. दत्ता आणि नमन धीर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – पंजाब प. डाव 46.5 षटकात सर्वबाद 152 (वधेरा 44, अभिषेक शर्मा 26, मार्कंडे नाबाद 26, खेरा 27, व्ही. कौशिक 7-41, विशाख 2-35), कर्नाटक प. डाव 3 बाद 142 (पडिकल खेळत आहे 80, पांडे खेळत आहे 13).
लालवानी, पारकर, कोटियान यांची अर्धशतके
2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे शुक्रवारपासून खेळविण्यात आलेल्या ब इलाईट गटातील सामन्यात बिहार विरुद्ध मुंबईने दिवसअखेर पहिल्या डावात 9 बाद 235 धावा जमविल्या. मुंबई संघातर्फे भुपेन लालवानी, सुवेद पारकर आणि तनुष कोटियान यांनी अर्धशतके झळकविली. बिहारतर्फे वीरप्रताप सिंगने 4 गडी बाद केले.
या सामन्यात बिहारने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. मुंबईच्या पहिल्या डावात लालवानीने 11 चौकारांसह 65 तर सुवेद पारकरने 6 चौकारांसह 50 धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 91 धावांची भागिदारी केली. शिवम दुबेने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 41, तनुश कोटियानने 7 चौकारांसह 50 धावा जमविल्या. अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला. केवळ 67 षटकांचा खेळ झाला. पंजाबतर्फे वीरप्रताप सिंगने 32 धावात 4 तर गनी आणि हिमांशू सिंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – मुंबई प. डाव 67 षटकात 9 बाद 235 (लालवानी 65, पारकर 50, दुबे 41, कोटियान 50, वीरप्रताप सिंग 4-32, गनी आणि हिमांशू सिंग प्रत्येकी 2 बळी).









