वाढत्या किमतीचा परिणाम : आयात 209 टन सोन्याची:वर्ल्ड गोल्ड कौन्सीलची माहिती
वृत्तसंस्था /मुंबई
एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाल्याच्या कारणास्तव सोन्याची खरेदी भारतात काहीशी घटलेली पाहायला मिळाली आहे. ही मागणी जवळपास 7 टक्के इतकी घटलेली पाहायला मिळाली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सील यांच्या ताज्या अहवालामध्ये या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची आयात 16 टक्के वाढून 209 टन वर पोहोचली आहे. 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये मागणीचा अंदाज 271 टन वर्तवला जात आहे तर 2023 च्या पूर्ण वर्षामध्ये मागणी 650 ते 750 टन राहणार असल्याचेही मत वर्ल्ड गोल्ड कौन्सीलने व्यक्त केले आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सीलचे भारतातील सीईओ सोमसुंदरम पीआर यांच्यानुसार दुसऱ्या तिमाहीमध्ये सोन्याची मागणी 7 टक्के घटलेली असून सध्याच्या घडीला सोन्याच्या किमती या विक्रमी स्तरावर वाढलेल्या आहेत. यादरम्यानच्या काळात दहा ग्रॅमच्या सोन्याची किंमत 64 हजारावर पोहचली होती.
कशी होती मागणी
या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये देशातील सोन्याची मागणी ही 158.1 टन इतकी राहिली आहे. तर मागच्या खेपेला ती 170.7 टन इतकी राहिली होती. मूल्याच्या तुलनेमध्ये पाहता 82,530 कोटी रुपयांचे सोने मागवले गेले. मागच्या वर्षी याच अवधीमध्ये 79,270 कोटी रुपयांचे सोने मागवले होते. दुसऱ्या तिमाहीमध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी 8 टक्के घटून 128 टन इतकी राहिली आहे. हीच मागणी मागच्या वर्षी याच अवधीत 140 टन इतकी दागिन्यांची मागणी राहिली होती.









