वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत पोंगलच्या दिनी आयोजित जल्लीकट्टू आणि मंजूविरट्टू कार्यक्रमांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये प्रेक्षक आणि एका बैलमालकाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे. तर वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन बैलांचाही मृत्यू ओढवला आहे. पुदुक्कोट्टईमध्ये कार्यक्रमादरम्यान एका बैलाचा मृत्यू झाला. तर शिवगंगा येथील सिरावयाल मंजूविरट्टूमध्ये एक बैलमालक आणि त्याच्या बैलाचा मृत्यू झाला आहे.
सिरवायल येथील मंजूविरट्टूमध्ये नादुविकोट्टई कीला आवंधीपट्टी गावातील थनेश राजा हे या आयोजनात भाग घेण्यासाठी बैलासह पोहोचले होते. त्यांचा बैल अखाड्यातून पळताना कंबनूरमध्ये एका विहिरीत कोसळला होता. बैलाला वाचविण्यासाठी राजा यांनी विहिरीत उडी घेतली होती. दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. मंजूविरट्टूमध्ये सुमारे 130 जण जखमी झाले. देवकोट्टई येथे एका प्रेक्षकाचा बैलाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
मदुराईच्या अलंगनल्लूरमध्ये वादीपट्टीनजीक मेट्टुपट्टी गावात पी. पेरियासामी हे बैलाच्या हल्ल्यात मृत्यमुखी पडले आहेत. या घटनेत अन्य 70 जण जखमी झाले आहेत. तिरुचिरापल्ली, करूर आणि पुडुकोट्टई जिल्ह्यांमध्ये चार वेगवेगळ्या जल्लीकट्टू आयोजनांमध्ये दोन प्रेक्षकांचा मृत्यू झाला आणि बैलमालक तसेच बैलांवर नियंत्रण मिळवू पाहणारे 148 जण जखमी झाले आहेत.
करूर जिल्ह्यातील कुजुमनीनजीक समुथ्रम येथील 60 वर्षीय कुलनथैवेलु यांचा जल्लीकट्टूदरम्यान मृत्यू झाला आहे. तर पुदुकोट्टई जिल्ह्यातील जल्लीकट्टूमध्ये सी. पेरूमल हे बैलाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत.
कृष्णागिरी जिल्ह्यातील बस्थलापल्लीमये आयोजित बैलांच्या शर्यतीदरम्यान 30 वर्षीय एका इसमाचा मृत्यू झाला.तर सलेम जिल्ह्यातील सेंथरापट्टीमध्ये बैलाच्या हल्ल्यात 45 वर्षीय इसमाला जीव गमवावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.









