महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी बेंगळुरात बैठक
बेळगाव : विविध मागण्यांसाठी बेळगावसह राज्यातील दहा महानगरपालिकांतील कर्मचारी सामुहिक रजेवर गेले होते. त्याचबरोबर कामबंद आंदोलन हाती घेण्यात आल्याने जागे झालेल्या सरकारने मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बेंगळुरात बैठकीचे आयोजन केले होते. नगरविकासमंत्री बैरती सुरेश, सचिव दीपा चोळण, वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्य मनपा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी एकूण 11 मागण्यांपैकी 7 मागण्या मान्य करण्यात आल्या तर उर्वरित 4 मागण्या वित्त विभागाकडे सोपविण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी आपल्या विविध मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत होते.
मात्र मागण्या मान्य करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे राज्य मनपा कर्मचारी संघटनेने 8 जुलैपासून कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार बेळगावसह राज्यातील 10 महानगरपालिकांचे कामकाज तब्बल सात दिवस बंद राहिले. याचा फटका राज्यातील नागरिकांना बसला. त्याचबरोबर विविध कामांच्या माध्यमातून मिळणारा महसूलदेखील कमी झाला. त्यामुळे या आंदोलनाची दखल घेत सरकारने मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी बेंगळुरात बैठकीचे आयोजन केले. सदर बैठकीत 11 मागण्यांपैकी 7 मागण्या सरकारने मान्य केल्या. उर्वरित 4 मागण्या वित्त विभागाकडे सोपविल्या आहेत. त्यामुळे उपस्थित राज्य मनपा कर्मचारी संघटनेच्यावतीने नगरविकासमंत्री बैरती सुरेश यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. मनपाचे कामकाज आता नियमित सुरू राहणार आहे.









