अटक केलेल्या तिघांवरही कारवाई
वृत्तसंस्था/ बालासोर
ओडिशाच्या बालासोर येथे 2 जून रोजी झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने बुधवारी 7 अधिकाऱ्यांना निलंबित केले. यामध्ये अटक करण्यात आलेल्या 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती दक्षिण पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार मिश्रा यांनी दिली आहे. हे अधिकारी सतर्क असते तर दुर्घटना घडलीच नसती, असा दावाही मिश्रा यांनी केला. गेल्या महिन्यातील ओडिशातील या रेल्वे अपघातात 293 हून अधिक लोकांचा मृत्यू होण्याबरोबरच 1,000 हून अधिक लोक जखमी झाले होते.
7 जुलै रोजी सीबीआयने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली. यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता अऊणकुमार महंत, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांचा समावेश होता. त्यांच्याविरोधात भादंविचे कलम 201 (गुन्ह्याचे पुरावे गायब करणे किंवा गुन्ह्याबद्दल चुकीची माहिती देणे) अंतर्गत देखील गुन्हा नोंद आहे. या तिघांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते हे तिन्ही आरोपींना माहीत होते, असा दावाही सूत्रांनी केला आहे.
बालासोरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या दक्षिणपूर्व विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. दुर्घटनेनंतर सीबीआयने लॉग बुक, रिले पॅनेल आणि उपकरणे जप्त करत या स्थानकाला सील केले होते. सध्या या स्थानकावर कुठलीच रेल्वेगाडी थांबू शकत नाही. बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेप्रकरणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अलिकडेच चौकशी अहवाल रेल्वे बोर्डाला सोपविला आहे. अहवालात ‘मानवी चूक’ आणि कोरोमंडल एक्स्प्रेसला ‘चुकीचा सिग्नल’ देण्यात आल्याचे नमूद आहे. परंतु अहवालातील उर्वरित माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. रेल्वे बोर्ड आता सीबीआयच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षा करत आहे.









