कारमध्ये आढळले मृतदेह : कर्जाच्या भारामुळे उचलले टोकाचे पाऊल : मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश
वृत्तसंस्था/ पंचकूला
हरियाणाच्या पंचकुलामध्ये एका कारच्या आत 7 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. प्रवीण मित्तल आणि त्यांच्या कुटुंबावर 20 कोटी रुपयांचे कर्ज होते. प्रवीण मित्तल हे हरियाणाच्या हिसार जिल्ह्याचे रहिवासी होते, दीर्घकाळापर्यंत ते पंचकूला येथे राहत होते आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणून त्यांनी कामही केले होते. मग त्यांनी टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय विस्ताराच्या प्रयत्नात मित्तल यांच्यावर मोठे कर्ज झाले हेते. या कर्जामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
कर्जाचा आकडा 20 कोटीवर पोहोचल्याने प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब नैराश्यात सापडले होते. अखेरीस मुले तसेच कुटुंबीयांसमवेत प्रवीण मित्तल यांनी आत्महत्या केली आहे. या सर्वांनी विष प्राशन केले होते. प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी, आई-वडील आणि तीन मुलांचा मृत्यू झाला आहे.
प्रवीण मित्तल यांनी लिहिलेली सुसाइड नोट मिळाली असून यात भाचा संदीप अग्रवालच अंत्यसंस्कार करणार असल्याचे नमूद आहे. मित्तल यांनी काही वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशच्या बद्दी येथे एक स्क्रॅप फॅक्ट्ररी सुरू केली होती. हा व्यवसाय कर्जातून सुरू केला होता, परंतु कर्ज फेडता न आल्याने बँकेने या फॅक्ट्ररीला जप्त केले होते.
मित्तल कुटुंबीय सोमवारी बागेश्वर येथील कार्यक्रमात सामील झाले होते. तेथून परतताना या कुटुंबाच्या सर्व सदस्यांनी विष प्राशन केले. कारमध्ये मृतदेह एकमेकांवर पडलेले पाहून स्थानिक लोकांनी पोलिसांना कळविले होते.









