केवळ बारा दिवसात 69 टक्के नोंदणी : महिलावर्गाचा उदंड प्रतिसाद : राज्यात बेळगाव जिल्हा दुसऱ्या स्थानी
बेळगाव : सरकारने जाहीर केलेल्या पाच गॅरंटी योजनांपैकी गृहलक्ष्मी योजनेची नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणीसाठी बेळगाव वन कार्यालयात महिलावर्गाची झुंबड सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यात 1 कोटी 14 लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 7 लाख 61 हजार 986 जणांची नोंद झाली आहे. शिवाय 69 टक्के नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे राज्यात गृहलक्ष्मी नोंदणीत बेळगाव जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या दरम्यान पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. शक्ती योजना, गृहज्योती पाठोपाठ गृहलक्ष्मीसाठी अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत. ग्रामवन, कर्नाटक वन, बेळगाव वन, बापूजी सेवा केंद्र आदी ठिकाणी विनाशुल्क नोंदणी केली जात आहे. विशेषत: महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून शहरात या योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे केवळ दहा-बारा दिवसात जिल्ह्यातील 7 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
सर्व्हर डाऊनची समस्या कायम
नोंदणी दरम्यान लाभार्थ्यांना रेशनकार्ड, आधारकार्ड आणि बँक पासबुक आवश्यक आहे. मात्र, बेळगाव वन आणि इतर नोंदणी कार्यालयांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास सहनही करावा लागत आहे. विशेषत: सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत असल्याने काम संथगतीने होऊ लागले आहे. मात्र, अशा परिस्थिती देखील बेळगावात मोठ्या प्रमाणात गृहलक्ष्मीसाठी अर्ज नोंदणी झाल्याची माहिती मिळाली आहे.
16 ऑगस्टपासून रक्कम जमा
या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील मुख्य महिलेच्या बँक खात्यात दरमहा 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. 16 ऑगस्टपासून ही रक्कम जमा केली जाणार आहे.
नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्य सरकारच्या हमी योजनेंपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेसाठी जिल्ह्यातील 7 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. 69 टक्के नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल. या नोंदणी प्रक्रियेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
– नागराज आर. (महिला व बालकल्याण खाते, सहसंचालक)









