उत्तर प्रदेशात सर्वाधिक बळी : महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या 5 वर्षात देशात रस्ते अपघातात 7 लाख 77 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 1.08 लाख लोकांचे बळी गेले. त्यानंतर तामिळनाडू (84 हजार मृत्यू) आणि महाराष्ट्र (66 हजार मृत्यू) दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जाहीर केलेल्या 2018 ते 2022 पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘भारतातील रस्ते अपघात, 2022’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. सदर अहवालातून रस्ते अपघातांविषयी सविस्तर आकडेवारी पुढे आली आहे. 2021 मध्ये देशात रस्ते अपघातात 1,53,972 मृत्यू झाले होते. तर 2022 मध्ये हा आकडा आणखी वाढून 1,68,491 वर पोहोचला.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच संसदेमध्ये वाढत्या रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त केली होती. रस्ते अपघातांबाबत जगातील सर्वात वाईट रेकॉर्ड भारताकडे आहे. त्यामुळेच जेव्हा मी आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी जातो तेव्हा रस्ते अपघातांबद्दल चर्चा सुरू असताना मी माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो, असे गडकरी म्हणाले होते.
‘वेग हा चिंतेचा विषय’
रस्ते अपघातांबाबत वेग हा चिंतेचा विषय असल्याचे गडकरींनी मान्य केले. लेन अनुशासनहीनता ही भारतातील खूप मोठी समस्या असल्याचेही ते म्हणाले. तथापि, लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना गडकरी यांनी जनतेला, विशेषत: तरुणांना वाहतूक शिस्तीचे प्रबोधन करण्याच्या गरजेवर भर दिला. बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व शिकवले पाहिजे. तसेच वाहतुकीचे उल्लंघन रोखण्यासाठी रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचाही त्यांनी उल्लेख केला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी लोकांना शिक्षित करण्यासाठी गडकरींच्या भावनांना दुजोरा देताना वाहनचालकांसाठी जगजागृतीपर कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले.









