वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
मध्य मेक्सिकोतील वॉटर पार्कमध्ये रविवारी झालेल्या एका गोळीबाराच्या घटनेत लहान मुलासह 7 जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला गुआनाजुआटो राज्यातील कोर्टाझार शहरातील एका रिसॉर्टमध्ये झाला. सुट्टी साजरी करण्यासाठी अनेक लोक जमले असताना अंदाधुंद गोळीबार झाला. रिसॉर्टच्या वॉटर पार्कमध्ये घुसून हल्लेखोराने गोळीबार सुरू केला. यात 3 महिला, 3 पुरुष आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच एका जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक जणांकडून गोळीबार झाल्याचा संशय असून हल्लेखोर फरार झाले आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी रिसॉर्टचेही बरेच नुकसान केले. हल्लेखोरांनी एका स्पाची तोडफोड केली. तसेच आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडून पळ काढला.









