वृत्तसंस्था/ सिकर
राजस्थानात रविवारी सकाळी कार आणि सार्वजनिक परिवहन बस यांच्यात झालेल्या रस्ते अपघातात एकाच परिवारातील सात जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागौरच्या बनथडी चौकात हा अपघात झाला. सर्व मृत सिकरमधील बिसायती चौकातील रहिवासी होते. सिकरहून नागौरला जात असताना खुनखुना परिसरात हा अपघात झाला. कारमधील प्रवासी हे एकाच कॉलनीतील रहिवासी होते. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा दर्शनी भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. जखमींना डिडवाना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच नागौरचे जिल्हाधिकारी सीताराम जाट, एडीएम शहर श्योराम वर्मा, उपअधीक्षक धरम पुनिया, आमदार चेतन दुडी यांच्यासह मोठ्या संख्येने लोक ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचले होते.









