टिप्पर कारगाडीवर स्थिरावल्यानंतर कारचालक चमत्कारिकरित्या बचावला : पाऊसामुळे रहदारी कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला
फोंडा : ओपा खांडेपार जन्क्शवर झालेल्या सात वाहनांच्या विचित्र अपघातात सुदैवाने कोणतीही मोठी गंभीर दुखापतीशिवाय सर्वजण सुखरूप बचावले. अपघाताताची घटना काल सोमवारी सायंकाळी 7 वा. सुमारास घडली. जन्क्शनजवळ बंद पडलेले अवजड वाहन, उलटलेल्या कार्गोखाली फोंडा 3 दुचाकी वाहने, स्वीफ्ट कारगाडीवर स्थिरावलेला टिप्पर ट्रक अशा सात वाहनाचा यात समावेश होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्वजण सुखरूप बचावले. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओपा रोड जन्क्शनजवळ एक अवजड वाहन एमएच 05इएल 4205 पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला बंदावस्थेत होते. मुर्डी खांडेपार येथून उतरणीवरून खाली येताना कार्गो केए 06 एए 5167 चा ब्रेक निकामी झाल्याने सरळ पुढे असलेल्या दुकानासमोर उलटला यावेळी तीन दुचाकी कार्गोखाली अडकल्या. मागाहून असलेल्या टिप्पर जीए 03 के 8668 ट्रकलाही निसटती धडक बसल्याने तोही एका बाजूला तिस्क उसगांवहून येणाऱ्या स्वीफ्ट कार जीए 04 ई 6965 च्या कोपऱ्यावर स्थिरावली. यावेळी कारगाडीचा चालक चमत्कारितरित्या बचावला. कार्गो कार जनरल स्टोअरच्या दारासमोर उलटली यावेळी तीथे पार्क केलेल्या तीन दुचाकी अडकल्याचा अंदाज फोंडा पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी उशिरा रात्रीपर्यंत क्रेनच्या साहाय्याने वाहने हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. सुदैवाने नेहमी वर्दळीच्या या ठिकाणावर यावेळी मोठा पाऊस पडत असल्यामुळे रहदारी कमी होती अन्यथा सकाळच्या व दुपारच्यावेळी अपघात घडल्यास मोठा अनर्थ घडला असता. याप्रकरणी हवालदार रघुनाथ गावस यांनी पंचनामा केला. बेळगांव महामार्गाचे खांडेपार पुलाजवळील भाग अद्याप जोडण्यात न आल्याने वाहतूकीची या जन्क्शनवर वाहतूकीचा खोळंबा होत आहे. मुर्डी खांडेपार येथून उतरणीवर खाली येताना अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सरकारने त्वरीत दखल घेत या खांडेपार पुलाच्या जोडणीचा भाग पुर्ण करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केला आहे.









