निवडणूक चुरशीने होण्याची शक्यता
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता अध्यक्षपदासाठी अनेक जण रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. सध्या सात जण अध्यक्षपदासाठी इच्छुक असून सारेच जण चाचपणी करू लागले आहेत. आता लवकरच या निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक प्रतिष्ठेची म्हणून पाहिली जाते. अध्यक्षपदासाठी अॅड. डी. एम. पाटील, अॅड. एस. एस. किवडसण्णावर, अॅड. आण्णासाहेब घोरपडे, अॅड. ए. एम. पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. सचिन शिवण्णावर, अॅड. शामसुंदर पत्तार यांच्यासह आणखी काहीजण इच्छुक आहेत. त्यामुळे यावर्षीही निवडणूक मोठ्या चुरशीने होणार आहे.
अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्षपदासाठीही अनेकजण रिंगणात उतरणार आहेत. उपाध्यक्षपदासाठी दोन जागा आहेत. त्यामुळे सध्या जवळपास 9 हून अधिक जण उपाध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. याचबरोबर जनरल सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी यासाठी सुद्धा चुरस वाढणार आहे. महिला प्रतिनिधी आणि पाच कमिटी सदस्य अशा एकूण 11 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी 50 हून अधिक जण रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मागीलवेळी 2400 मतदार होते. तर यावेळी त्यामध्ये 400 हून अधिक मतदारांची वाढ झाली आहे. तसे पाहता 4 हजारांहून अधिक वकील आहेत. मात्र अनेकांनी तालुका बार असोसिएशनमध्येही आपली नावे नोंदविली आहेत. त्यामुळे त्यांची नावे कमी करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. एकाच ठिकाणी मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे. त्यामुळे मतदारांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.









