सुनामीचा इशारा जारी
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियातील कामचटकाच्या पूर्व किनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. त्यानंतर आणखी काही वेळातच 5.8 तीव्रतेचे पाच भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे सुनामीचा इशारा देण्यात आला. यादरम्यान किनाऱ्यावर 30 ते 62 सेंटीमीटर उंचीच्या लाटा उसळल्या. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या भूकंपाच्या व्हिडिओंमध्ये घरांमध्ये फर्निचर आणि दिवे थरथरताना दिसत आहेत. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की रस्त्यांवर पार्क केलेली वाहनेही हादरताना दिसत होती. मात्र, सुदैवाने कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
रशियात गेल्या तीन महिन्यात या प्रदेशात चारवेळा 7.0 रिश्टर स्केल किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप नोंदवले गेले आहेत. शुक्रवारी सकाळी जाणवलेल्या तीव्र क्षमतेच्या भूकंपाच्या धक्क्यानंतर सर्व आपत्कालीन सेवा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्याचे कामचटकाचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी सांगितले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण विभागानुसार या भूकंपाचे केंद्र रशियातील पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की शहरापासून 128 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर खोलीवर होते. रशियाच्या राज्य भू-भौतिक सेवेने जारी केलेल्या अहवालानुसार या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल इतकी नोंद केल्याची माहिती देण्यात आली.









