सुनामीचा धोका टळला : तीव्र हादऱ्यांमुळे लोकांमध्ये घबराट
वृत्तसंस्था/मनिला
फिलिपाईन्सच्या दक्षिणेकडील बेट मिंडानाओ येथे शुक्रवारी सकाळी 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता. मात्र, दिवसअखेरपर्यंत समुद्रात किंवा अन्यत्र कोठेही मोठे धक्के न जाणवल्यामुळे सुनामीचा धोका टळल्याचे सांगण्यात आले. पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सेंटरने आता परिस्थिती सामान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. या भूकंपाचा फटका दावाओ शहराला जाणवला आहे. हे शहर मिंडानाओ बेटावरील दावाओ डेल सुर प्रांताचा भाग आहे. मिंडानाओ द्वीपसमूहात 27 प्रांत आहेत. येथे रुग्णालये, शाळा आणि रस्त्यांना झालेल्या नुकसानाचे असंख्य फुटेज समोर आले आहेत. भूकंपाच्या हादऱ्यांमुळे लोक घरे, इमारती, शाळा, कार्यालयामधून बाहेर पडून मोकळ्या जागेत गोळा झाल्याचे दिसून येत आहे.
मुख्य भूकंपानंतर फिलिपाईन्सच्या भूकंपशास्त्राrय संस्थेने आणखी अनेक धक्क्यांचा इशारा दिला. अर्ध्या तासाच्या कालावधीत 5.9 आणि 5.6 रिश्टर स्केलचे अनेक धक्के जाणवले. त्यानंतर एजन्सीने विनाशकारी सुनामीचा इशारा दिला होता. मात्र, अन्य धक्क्यांची तीव्रता कमी असल्यामुळे लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मध्य आणि दक्षिण फिलिपाईन्समधील किनारी शहरांमधील रहिवाशांना तात्काळ उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. यापूर्वी 30 सप्टेंबर रोजी फिलिपाईन्सच्या सेबू प्रांतात 6.9 रिश्टर स्केलच्या भूकंपात 69 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच सुमारे 150 जण जखमी झाले होते.
इंडोनेशियातही इशारा
या भूकंपानंतर इंडोनेशियाच्या किनारी भागात 17 सेंटीमीटर (सुमारे 6 इंच) उंचीच्या लाटा नोंदल्या गेल्या होत्या, असे इंडोनेशियाच्या भूकंप आणि सुनामी केंद्राच्या प्रमुखांनी सांगितले.









