जुन्या तहसीलदार कार्यालयातील प्रकार : शेतकऱ्यांची गैरसोय : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कारभारावर संशय
बेळगाव : कचेरी रोडवरील जुन्या तहसीलदार कार्यालयातील सात-बारा उतारा वितरण केंद्र गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. यामुळे एकाच केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. सरकारी सात-बारा वितरण केंद्र वारंवार बंद ठेवण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे. एजन्सीला लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने सरकारी केंद्र बंद ठेवल्याचा आरोप केला जात आहे. याकडे तहसीलदार लक्ष देतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. जुन्या तहसीलदार कार्यालयात भूमी विभाग असल्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ कायम असते. तसेच शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना सात-बारा उताऱ्यांची कायम गरज असते. सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सात-बारा उतारा मिळविण्याकरिता शेतकऱ्यांची तहसीलदार कार्यालयात गर्दी होत आहे. मात्र या ठिकाणी सरकारी सात-बारा उतारा वितरण केंद्र गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. तर खासगी कंपनीला देण्यात आलेले उतारा केंद्र सुरू आहे. याठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेवून दोन केंद्रांची सोय करण्यात आली होती.
वेगवेगळी कारणे सांगून केंद्र बंद ठेवण्याचा बनाव
सरकारी केंद्र वारंवार बंद राहत असल्याने एकाच केंद्रांवर गर्दी होवून शेतकऱ्यांना उतारा मिळविण्यासाठी ताटकळत उभे रहावे लागत आहे. सरकारी केंद्र बंद असल्याचे कारण विचारल्यास प्रिंटर खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेकवेळा सर्व्हर समस्या, इतर तांत्रिक कारण सांगून केंद्र बंद ठेवले जात आहे. यामुळे सरकारी केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे. एजन्सीला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळी कारणे सांगून केंद्र बंद ठेवण्यात येत असल्याचा बनाव करत असल्याचा आरोपही होत आहे.
प्रिंटर खराब झाल्याचे कारण
तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावले असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. याकडे तहसीलदार लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे. गेल्या चार दिवसांपासून प्रिंटर खराब झाल्याचे कारण सांगून केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.









