आजपर्यंत 4 लाख 35 हजार 415 हेक्टर जमिनीत 61 टक्के पेरणी : खरीप हंगामाबाबत कृषी खात्याशी साधला संवाद
अरुण टुमरी / काकती
यंदाचा खरीप हंगाम साधण्यासाठी कृषी खात्याने नियोजन आखून, बी-बियाणे, खते, सुधारित तंत्रज्ञान शेतकऱयांपर्यंत पोहचविले आहे. मान्सूनचे आगमन झालेला पाऊस आणि शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत पोहचून खरीप हंगाम पेरणी कितपत साध्य केली आहे. याविषयी कृषी खात्याचे उपसंचालक डॉ. एच. डी. कोळेकर यांच्याशी साधलेला संवाद शेतकरी बांधवांना मौलिक मार्गदर्शक ठरणारा आहे.
यंदा मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाला असल्याने माळ रानावरील पिकांची पेरणी वेळेत झाली आहे. यावर्षी खरीप हंगामाचे उद्दिष्ट जिल्हय़ात 7 लाख 16 हजार 925 हेक्टर जमिनीत साध्य करावयाचे आहे. यापैकी आजपर्यंत 4 लाख 35 हजार 415 हेक्टर जमिनीत 61 टक्के पेरणी झालेली आहे. तालुक्यात सोयाबीन, मका, भात, उडीद, सूर्यफूल, मूग, ज्वारीची पेरणी तर बटाटा बियाणे, रताळी वेलीची लागवड झाली आहे. अधिक पावसाच्या ठिकाणी खानापूर, बेळगाव तालुक्यात रोप लागवडही होणार आहे. गादी व वाफ्यावर भात व नाचण्याची रोपवाटिका सजल्या असून येत्या पंधरवडय़ात पुनर्लागवड होणार आहे. 39 टक्के पेरणीचे उद्दिष्ट येत्या 10-12 दिवसात तर सिंचनाच्या ठिकाणी 8 दिवसांत 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. तर उसाच्या पिकांची वाढ आतापर्यंत सर्वोत्कृष्ट झाली आहे.
बियाणांची उपलब्धता
यावर्षी खरीप पिकांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोरोना संसर्गाच्या संकटामुळे शेतकरी बांधव चिंतेत होता. याकरिता कृषी खात्याने 53,503 क्विंटल विविध बियाणांचा साठा रयत संपर्क केंद्र व प्राथमिक कृषी संघामार्फत शेतकऱयांना वितरण केला आहे. यापैकी 42 हजार 161 क्विंटल बियाणांचे वितरण झाले आहे तर 11 हजार 487 बियाणांचा साठा अद्याप उपलब्ध आहे.
रासायनिक खताचा मुबलक साठा
यंदाच्या खरीप हंगामासाठी 2 लाख 56 हजार 140 मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी असून आजपर्यंत जिल्हय़ात खताची कमतरता होऊ दिली नाही. यामुळे छापील किमतीपेक्षा जादा पैसे देऊन खते खरेदी करू नयेत. सुमारे 51 हजार 841 मेट्रिक टन विविध दाणेदार, मिश्र खताचा साठा शेतकरी प्राथमिक संघ व खासगी दुकानातून उपलब्ध करण्यात आला आहे.
सेंद्रिय शेतीचा आत्मा
सेंद्रिय शेतीचा आत्मा सेंद्रिय कर्ब असून शेतकऱयांनी भात रोप लागवड करणाऱया शेतकऱयांनी रोप लागवडीपूर्वी जमिनीच्या सुपिकतेसाठी रोप लागवडीपूर्वी मशागत करताना तागाचे पीक जमिनीत गाडावे यासाठी रयत संपर्क केंद्रात तागाचे बियाणे (सणब) मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे.
शेतकऱयांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज
सेंद्रिय कर्बामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा होते. सेंद्रिय कर्ब हे माती असलेल्या असंख्य सुक्ष्मजीवांचे अन्न आहे. आपल्याकडील जमिनीमध्ये रासायनिक खताच्या वारेमाप वापरामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाले आहे. साधारणपणे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.60 टक्क्यापेक्षा जास्त असावे लागते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्नद्रव्य हे सेंद्रिय स्वरुपात घेत नाहीत. तर सूक्ष्मजीवांकडून सेंद्रिय घटकाचे विघटन होते. त्यानंतर असेंद्रिय स्वरुपात सर्व अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. सेंद्रिय कर्बाचे पीक व जमिनीच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ते जाणून घेऊन शेतकऱयांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे.
खरीप हंगाम हा सर्वात महत्त्वाचा असून हंगामानुसार पिकांचे सर्व व्यवस्थापन करावे. कोणतीही कीड आणि रोग दिसून आल्यास जवळचे रयत संपर्क केंद्र किंवा तालुका कृषी कचेरीला भेट देऊन औषधाचा सवलतीत लाभ घ्यावा, असेही आवाहन डॉ. कोळेकर यांनी केले आहे.