वृत्तसंस्था/ प्याँगचांग, द.कोरिया
येथे सुरू असलेल्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या महिला संघाला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मंगळवारी भारतीय संघाला थायलंडकडून 0-3 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय महिलांनी 5 ते 8 व्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सिंगापूरवर 3-2 अशी मात केली होती. पण नंतर पाचव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत थायलंडकडून पराभव पत्करावा लागला. मनिका बात्राने विजयी सुरुवात करून देताना जिंगयी झोयूवर 11-9, 11-3, 11-6 अशी मात केली. दुसऱ्या सामन्यात श्रीजा अकुलाला जियान झेंगकडून पराभूत झाल्याने थायलंडने 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सामन्यात ऐहिका मुखर्जीने रु झिन वाँगवर मात करून भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
परतीच्या एकेरीत मनिका बात्राला जियान झेंगवर विजय मिळविता आला नाही. तिने हा सामना 8-11, 6-11, 7-11 असा गमविला. त्यामुळे बरोबरी साधण्यासाठी श्रीजा अकुलावर जबाबदारी आली. मात्र हैदराबादच्या श्रीजाने विश्वास सार्थ ठरवित जिंगयी झोयूवर 3-1 असा रोमांचक विजय मिळवित भारताला 2-2 अशी बरोबरी साधून देत भारताला लढत जिंकण्याची संधी निर्माण करून दिली. मात्र थायलंडच्या सुथासिनी सावेताबटने ऐहिकावर 11-6, 11-5, 11-6 अशी मात केली.
मिश्र दुहेरीतही भारताला अपयश आले. शेवटच्या 32 फेरीत जी. साथियान व मनिका बात्रा यांना थायलंडच्या फाकपूम सांगुआनसिन व ओरावन परानांग यांच्याकडून तर हरमीत देसाई व श्रीजा अकुला यांना अग्रमानांकित जपानच्या टोमोकाझू हारिमोटो व हिना हायाता यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी पहिल्या फेरीत मलेशियन जोडीवर मात केली होती. भारताच्या पुरुष संघाने उपांत्य फेरी गाठत किमान कांस्यपदक निश्चित केले असून बुधवारी त्यांची लढत चिनी तैपेईविरुद्ध होणार आहे.









