वृत्तसंस्था /नवी दिल्ली
नेस्ले इंडियाने 30 जून रोजी समाप्त झालेल्या तिमाहीमधील निकाल सादर केला आहे. यामध्ये कंपनीने 2023-24 या व्यावसायिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत 698.34 कोटींचा नफा कमाई केली असल्याची माहिती दिली आहे. जानेवारी ते डिसेंबर हे कंपनीचे आर्थिक वर्ष आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 510.24 कोटी रुपयांचा नफा झाला होता. एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की तिमाहीत त्यांची एकूण विक्री 15.02 टक्क्यांनी वाढून 4,619.50 कोटी रुपयांची झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत 4,015.98 कोटींची विक्री झाली होती. एप्रिल-जून तिमाहीत नेस्ले इंडियाचा एकूण खर्च 11.07 टक्क्यांनी वाढून 3,743.15 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत 3,369.81 कोटी रुपये होता. कंपनीने निर्यात विक्रीत 25.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. नेस्लेची देशांतर्गत बाजारात विक्री 14.6 टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्षाच्या तिमाहीत रु. 4,420.77 कोटी झाली आहे, जी मागील वर्षीच्या तिमाहीत 3,857.56 कोटी होती. नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन म्हणाले, देशांतर्गत बाजारात कंपनीच्या विक्रीत वाढ झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या नफ्यावर दिसला आहे.









