कोल्हापूर / इम्रान गवंडी :
दिवसेंदिवस सर्पदंशाचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात गत वर्षात तब्बल 690 जणांना सर्पदंश झाला आहे. गतवर्षी सर्पदंशाने चौघांना मृत्यूने कवटाळले आहे. केवळ साप चावल्याच्या भितीपोटी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पूर्ण प्रशिक्षण नसताना केवळ साप पकडण्याचा छंद व धाडसामुळेही सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. साप चावल्यानंतर घाबरून न जाता तत्काळ जवळील शासकीय रूग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. जिल्ह्यात रोज सर्पदंशाची घटना घडत आहेत.
नाग, मन्यार, घोणस, फुरसे या चार विषारी सापांचा अधिवास राज्यासह जिल्ह्यात आढळून येत आहे. सापांच्या एकूण 200 ते 250 सापांच्या जाती असल्यातरी यातील केवळ नाग, मन्यार, घोणस, फुरस या चारच सापांच्या जाती विषारी आहेत. सापांच्या अधिवासात होणारा मानवी हस्तक्षेपामुळे सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. मानवी वस्त्यांचा झपाट्याने विस्तार होत आहे.जंगलातील लाकूड तोड, मोठमोठ्या दळवळणाच्या प्रकल्पामुळे वाढणारे सिमेंटचे जंगल आदी कारणामुळे सापांसह अनेक जनावरांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
गतवर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हाकवे तालुका कागल येथील 66 वषीय वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. वर्षापूर्वी रात्री गाढ झोपेत असताना सर्पदंश झाल्याने 6 वर्षाच्या चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला. पकडलेला नाग जंगलात सोडताना सर्पदंश झाल्यामुळे एका तरूण सर्पमित्राला जीव गमवावा लागला. केवळ सापावर पाय पडल्याने घाबरून एका 12 वर्षीय बालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याची घटना गतवर्षी घडल्या आहेत. त्यामुळे तत्काळ उपचार घेणे योग्य असल्याचे तज्ञांनी सांगितले.
- अफवांवर विश्वास नको
शासकीय जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशाच्या रुग्णांसाठी अँटी स्नेक व्हेनमची उपलब्धता आहे. ही लस तीन तासात घेतल्यास धोका टळू शकतो. मांत्रिक, झाड पाल्याच्या उपचारामध्ये वेळ न घालवता तत्काळ शासकीय रूग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
- विषारी सापांविषयी थोडक्यात
मन्यार : हा साप शक्यतो रात्री बाहेर पडतो. उंदीर हे त्याचे प्रमुख खाद्य असल्याने मानवी वस्तीत याचा वावर होतो. याचे दात लहान असल्याने दंश झाल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष होऊन वेळेत उपचार न मिळाल्याने धोका अधिक बळावतो. याच्या दंशामुळे मेंदू, मज्जासंस्था व रक्तप्रवाहावर परीणाम होतो. रक्ताच्या गुठळ्या होण्याचा संभव असतो.
नाग : हा साप शेतामध्ये अधिक अढळतो. याच्या दंशानंतर तीव्र वेदना, सूज, लालसरपणा, रक्तस्त्राव, अर्धागवायू, श्वसनास त्रास होतो. अशक्तपणा, डोकेदुखी, त्वचेचा रंग बदलणे, घाम येणे अशी लक्षणे दिसतात.
घोणस : घोणस साप साधारणत: 5 ते 7 फुट लांब असतो. हा साप उडी मारून दंश करतो. पाय व पायाच्या वरच्या भागात याचा दंश होतो. याच्या दंशानंतर रक्तस्त्राव, मळमळ, उलट्या, अतिसार, तंद्री, चक्कर, दुहेरी किंवा अंधुक दृष्टी होऊ शकते. दंशाच्या ठिकाणी मोठे फोड येऊ शकते. रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होते.
फुरसे : फुरसे साप हा डोंगराळ भागात आढळतो. जंगलातील लाकूड तोडीसह आदींच्या माध्यमातून मानवी वस्ती येऊ शकतो. याचा दंश झाल्यानंतर अतिसार, ताप, थंडी, श्वसनाला त्रास, चक्कर, डोळे पायाने भरणे आदी लक्षणे दिसतात. अर्धागवायू, रक्तस्त्राव, नैसर्गिकरीत्या रक्तस्त्राव व वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यूची शक्यता असते.
- विषारी सर्पदंशानंतर प्रथमोपचार :
साप चावलेल्या व्यक्तीला शांत व स्थिर ठेवा. धीर द्या.
तत्काळ रूग्णवाहिकेशी संपर्क साधा
चावलेल्या जागी दाबपट्टी लावा.
–चावलेली जागा स्थिर करा.
–मेंदू व हृदयाकडे विष पसरणार नाही याची काळजी घ्या.
- हे करू नका
–जखमेवर बर्फ किंवा पाणी वापरू नका
–पारंपारीक उपचार टाळा
–चावलेल्या जागी ब्लेडने किंवा इतर धारदार वस्तूने कापून विष काढण्याचा प्रयत्न करू नका
–उपचारासाठी वेळ घालवू नका
- चुकीच्या उपचारामध्ये वेळ नको
साप दिसल्यास त्याच्या जवळ न जाता तत्काळ पूर्ण प्रशिक्षणार्थी सर्प मित्रांशी संपर्क साधावा. सापांच्या हालचलींवर लक्ष ठेवावे. सर्पदंशाने काहीवेळा घाबरून मृत्यू होऊ शकतो. सर्प दंशानंतर मांत्रिक, झाडपाला अशा चुकीच्या उपचारात वेळ घालवू नका. तत्काळ शासकीय रूग्णालयात उपचार घेणे महत्वाचे.
धनंजय नामजोशी, सर्पमित्र








